पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथे सर्वेश्वर कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने ७० किलो वजनी गटातील भव्य ‘महासंग्राम’ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्पर्धा दि. १६ मे ते १८ मे २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सायंकाळच्या सत्रात रंगणार आहे.ग्रामीण भागातील कबड्डी खेळाला प्रोत्साहन देणे आणि युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेत जिल्ह्यासह विविध भागांतील नामांकित संघ सहभागी होणार असून, चुरशीच्या लढती पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना मिळणार आहे.स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ७१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी २० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना दररोज वैयक्तिक बक्षिसांचेही वितरण करण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन स्पर्धा समितीचे अध्यक्ष तथा लोटस स्कूलचे चेअरमन संभाजी भोसले यांनी केले आहे. त्यांच्यासह राजाराम सावंत, गजानन कौंदाडे आणि अमर जाधव यांनीही स्पर्धेच्या तयारीसाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार अमल महाडिक आणि आमदार अशोक माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सरपंच सौ.पद्मजा करपे, पंचायत समिती सदस्या सौ.कमल कौदाडे, जि.प. सदस्य सलीम महात, उपसरपंच विजय जाधव, महेश चव्हाण, सतीश पाटील, कृष्णात करपे, विजय पाटील, सुरेश यादव, उद्योजक संतोष बाटे, संग्राम कदम, उदय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून परिसरातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.