कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी

Spread the love

कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण; शिक्षकांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा आदर्श

कोथळी / प्रतिनिधी 

कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी आणि दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांचा सुपुत्र अप्रतिम रविराज ऐवळे याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमातून तब्बल 90.40 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासचा आधार न घेता केवळ शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन,स्वतःची जिद्द आणि पालकांच्या प्रेरणेच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. त्यामुळे संपूर्ण कोथळी परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दहावीच्या निकालानंतर अप्रतिमच्या यशाची बातमी गावासह शिरोळ तालुक्यात वेगाने पसरली आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे कौतुक करण्यात आले.दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन करत त्याच्या मेहनतीचे कौतुक केले.जयसिंगपूरचे उद्योगपती योगेश सारस्वत, स्वाभिमानीचे विक्रम पाटील,डॉ. कुमार पाटील,रमेश मिठारे यांच्यासह अनेक सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.अप्रतिमचे यश हे केवळ गुणांपुरते मर्यादित नसून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.आजच्या स्पर्धेच्या युगात कोचिंग क्लासशिवाय मोठे यश मिळणे अवघड मानले जाते.मात्र अप्रतिमने आपल्या कृतीतून हे मत चुकीचे ठरवत “शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यावरही यशस्वी वाटचाल करता येते,” हे सिद्ध करून दाखवले आहे.अप्रतिमने आपल्या अभ्यासाचा प्रवास अत्यंत साध्या पद्धतीने सुरू केला होता. सुरुवातीला तिमाही परीक्षेत त्याला केवळ 66 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी त्याने स्वतःच्या अभ्यासपद्धतीचा गंभीरपणे विचार केला.शिक्षकांनी त्याला सातत्य, वेळेचे नियोजन आणि नियमित सराव याचे महत्त्व पटवून दिले.त्यानंतर त्याने अभ्यासात शिस्त आणली.त्याचा परिणाम सहामाही परीक्षेत दिसून आला आणि त्याला 76 टक्के गुण मिळाले.पुढे सराव परीक्षेत 75 टक्के, तर पूर्व परीक्षेत 81 टक्के गुण मिळवत त्याने सातत्याने प्रगती केली.अप्रतिममधील होत असलेला बदल शिक्षकांच्या लक्षात आला.आदर्श विद्यालयातील शिक्षकांनी त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला 60 टक्के गटात असलेला विद्यार्थी पुढे ‘स्कॉलर बॅच’मध्ये पोहोचला. शिक्षकांनी त्याच्या अभ्यासातील क्षमता ओळखून त्याला योग्य दिशा दिली.अभ्यासातील चुका समजावून सांगितल्या,उत्तरपत्रिकेचे नियोजन शिकवले आणि आत्मविश्वास वाढवला.याच मार्गदर्शनामुळे अप्रतिमने थेट 90 टक्क्यांच्या श्रेणीत झेप घेतली.या यशाबाबत बोलताना पालक रविराज ऐवळे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत शिक्षकांचे आभार मानले. “अप्रतिमच्या यशाचे सर्वाधिक श्रेय हे त्याच्या शिक्षकांनाच जाते.त्यांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केले.शाळेतील शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे शिल्पकार असतात,” असे ते म्हणाले.आई-वडिलांनीही त्याच्या अभ्यासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले. अभ्यासासाठी दबाव न टाकता नियमित प्रोत्साहन दिले. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून अप्रतिमने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.वेळेचे योग्य नियोजन,सातत्यपूर्ण पुनरावृत्ती आणि शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन हेच त्याच्या यशाचे मुख्य सूत्र ठरले.ग्रामीण भागातील अनेक पालकांमध्ये आपल्या मुलांनी मोठे यश मिळवण्यासाठी महागडे कोचिंग क्लास आवश्यक असल्याची भावना निर्माण झाली आहे. मात्र अप्रतिम ऐवळेच्या यशामुळे या समजुतीला छेद मिळाला आहे. शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचे समर्पण आणि विद्यार्थ्याची जिद्द यांच्या जोरावरही उत्कृष्ट यश संपादन करता येते, हे त्याने सिद्ध केले आहे.अप्रतिमच्या या यशामुळे आदर्श विद्यालयाचाही गौरव वाढला आहे. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात आणखी विद्यार्थी प्रेरणा घेऊन अभ्यासाकडे वळतील,अशी भावना व्यक्त होत आहे.कोथळी गावासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे.दहावीच्या परीक्षेत मिळवलेले हे यश म्हणजे अप्रतिमच्या आयुष्यातील पहिला मोठा टप्पा असून भविष्यातही तो अशाच प्रकारे उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याच्या मेहनतीला,चिकाटीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आज संपूर्ण परिसरातून सलाम केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!