शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात अवैध धंद्यांनी अक्षरशः मोकाट रूप धारण केले असून दारू, मटका, जुगार, लॉजिंग तसेच अमली पदार्थ विक्रीचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालले आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे व्यवसाय खुलेआम सुरू असतानाही पोलिस प्रशासन मात्र ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.उदगाव – अंकली टोल नाका, गणेशवाडी, दत्तवाड, दानवाड, पाचवा मैल यांसारख्या सीमा भागात रात्री उशिरापर्यंत पान टपरी,हातगाडे, हॉटेलवर बेकायदा दारू विक्री राजरोस सुरू असल्याचे चित्र आहे.राज्य शासनाने दारूबंदीबाबत कठोर भूमिका घेतली असली तरी स्थानिक स्तरावर मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे.अमली पदार्थ,गांजा,मटका आणि जुगार अड्ड्यांवर तर रात्री उशिरापर्यंत गर्दी होत असून, या सर्व प्रकारांना काही स्थानिक ठाणेदारांचा वरदहस्त असल्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे.विशेष म्हणजे पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी या अवैध धंदेवाल्यांकडून नियमित हप्ते घेत असल्याची खमंग चर्चा तालुक्यात सुरू आहे.त्यामुळेच अनेक वेळा तक्रारी होऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.अवैध धंद्यांमुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकत असून गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढीस लागली आहे.शेतकऱ्यांच्या मोटारीची चोरी,भांडणे,मारामाऱ्या या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिक तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेले तर त्यालाच कायद्याचा धाक दाखवत अडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने तक्रारदार तक्रार देण्यास टाळत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी हे अवैध व्यवसाय इतक्या बिनधास्तपणे सुरू आहेत की वरिष्ठ अधिकारी ये-जा करत असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.त्यामुळे “कारवाई का होत नाही?” हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी स्वतः लक्ष घालून या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.शिरोळ तालुक्यात वाढत चाललेली ही बेकायदेशीर व्यवस्था पोलिस प्रशासनासाठी मोठे आव्हान बनली असून,आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जागे होऊन धडक मोहीम राबविणार का,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.