अभ्यासू व आक्रमक व्यक्तिमत्त्व हरपले; नारायण मोरे यांचे निधन

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील शेती, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले नारायण गुंडा मोरे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.नारायण मोरे हे अभ्यासू विचारांचे ठाम पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात होते ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच प्रखड भूमिका घेतली. स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू वृत्ती आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांचा परिसरात मोठा मान होता विविध विषयांचा सखोल अभ्यास करून ते आपली भूमिका मांडत असत.त्यामुळे गावातील अनेक सामाजिक व सहकारी संस्थांच्या कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.मोरे यांनी शिरोली विकास सोसायटी, पंचगंगा पाणीपुरवठा संस्था, पांडुरंग पाणीपुरवठा संस्था, शाहू दूध संस्था, आदर्श सहकारी पतसंस्था, शिरोली सहकारी दूध संस्था तसेच ग्रामपंचायत अशा अनेक संस्थांमध्ये अनेक वर्षे जबाबदारी सांभाळत काम केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे अनेक संस्थांना दिशा मिळाली. गावाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विशेषतः पाणीपुरवठा, शेती आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला होता.राजकीय क्षेत्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे ते विश्सू सहकारी म्हणून ओळखले जात होते. गावपातळीपासून तालुका पातळीपर्यंत विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा प्रभाव जाणवत असे. कार्यकर्त्यांशी आत्मीयतेने संवाद साधणे आणि प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे ही त्यांची खासियत होती.त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी संस्था पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख करत ग्रामीण भागातील एक अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जन विधी रविवारी सकाळी नऊ वाजता होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!