पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
सध्या शिरोली पुलाची येथील चर्चेत असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणावरून कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण तापले असतानाच, बुधवारी सायंकाळी बजरंग दलाचे कार्यकर्ते निलेश शिंदे याला अज्ञात दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणातून माघार न घेतल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देत हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे शिरोली परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.मिळालेल्या माहितीनुसार, निलेश शिंदे हे कोल्हापूर येथील कुंदन पाटील यांची भेट घेऊन शिरोली गावाकडे परत येत होता त्याला पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीजवळील पीर दर्ग्याजवळ सेवा रस्त्यावर मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शिंदे यांना अडवले. संशयितांनी थेट पिस्तुलाचा धाक दाखवत लव्ह जिहाद प्रकरणातून माघार घेण्याची धमकी दिली आणि तिथून पोबारा केला. घटनेनंतर भयभीत झालेल्या शिंदे यांनी तत्काळ शिरोली पोलीस ठाण्याचे गोपनीय अधिकारी निलेश कांबळे यांना फोनवरून माहिती दिली. कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना फोन करून सर्व माहिती दिली.या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिरोली पोलीस ठाण्यात जमा झाले. गुन्हा दाखल करून घेण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. आमच्या आया बहिणीना संरक्षण नाही मात्र नराधमांच्या नातेवाईकांना पोलीस प्रोटेक्शन दिले जाते हा कोणता कायदा असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर विभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. आरोपींना १ मे पर्यंतची दोन दिवसाची शोधून काढण्याचे आश्वासन दिले निलेश शिंदे आणि योगेश खाडे (वाय. के.) या हिंदुत्वादी कार्यकत्याना यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. असे आश्वासन पोलिसानी दिले.सध्या शिरोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून,गाडीवरून आलेल्या अज्ञातांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.