पुलाची शिरोली / प्रतिनिधी
पुलाची शिरोली (ता.हातकणंगले) येथील पेपर विक्रेता अशोक कांबळे यांची कन्या कु.डॉ. आरती पूनम अशोक कांबळे हिने आपल्या जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.मुंबई येथील सुप्रसिद्ध सायन हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज येथे एमडी पदव्युत्तर शिक्षणासाठी तिची निवड झाली आहे.आरतीने नीट (NEET-PG) परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करत स्पर्धेच्या कठीण शर्यतीत आपले स्थान भक्कम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना तिने कधीही हार मानली नाही.वडील अशोक कांबळे हे गावात पेपर विक्रीचा व्यवसाय करतात.आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले.आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत आरतीने हे यश मिळवले आहे., लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या आरतीने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले होते.एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने एमडीसाठी कठोर परिश्रम घेतले. तिच्या या यशामुळे पुलाची शिरोली गावासह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावकऱ्यांनी तिचा सत्कार करण्याचा निर्धार केला आहे.सामान्य कुटुंबातील मुलगी मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने उच्च शिक्षणाच्या शिखरावर पोहोचू शकते,हे आरतीने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.तिच्या या यशामुळे गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून भविष्यातही ती वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कु.डॉ.आरती कांबळे हिचे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.