ट्विंकल स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगातून उलगडले विज्ञानाचे विश्व, पुस्तकातील संकल्पना कृतीतून अनुभवली 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी 

शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अलीकडेच विज्ञान प्रदर्शन व कला प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध वैज्ञानिक संकल्पना आणि सर्जनशील कल्पना प्रभावीपणे सादर केल्या.प्रदर्शनास पालक,मान्यवर आणि ग्रामस्थांचीही उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सौरमंडळ,चंद्राचे टप्पे, चंद्रयान मोहिम, प्रदूषण जागरूकता, जंगल व वर्षावन संवर्धन, पाण्याचे चक्र यांसारख्या विषयांवर माहितीपूर्ण प्रकल्प सादर केले. लहानग्यांनी सादर केलेल्या मॉडेल्समधून त्यांची कल्पकता,अभ्यासू वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून आला. काही विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व उपयुक्त वस्तू तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे विज्ञान समजून घेण्याची संधी मिळाली. पुस्तकातील संकल्पना कृतीतून अनुभवता आल्याने त्यांच्या मनात विज्ञानाविषयीची आवड अधिक दृढ झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणीची बीजे रोवली जातात, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.माजी सदस्य महेश चव्हाण, पं. स. माजी सदस्य अनिल खवरे, माजी उपसरपंच सुरेश यादव, पत्रकार राजू पाटील,शिवसेना शहर प्रमुख राजकुमार पाटील, उपशहरप्रमुख नितीन दळवी, शिवसेना नेते सतीश रेडेकर, सिग्मा गक्रिएटर्सचे संस्थापक रोहन पाटील, एस. डी. अकॅडमीचे संस्थापक शुभम महांकाळे, स्कूलचे चेअरमन संतोष बाटे आणि प्रिन्सिपल मानिषा बाटे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मा. राज पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात वैज्ञानिक शोध घेण्यासाठी प्रेरणा दिली. रोहन पाटील यांनी कला व विज्ञान क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.महेश चव्हाण यांनी अशा प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडतो,असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील तसेच पुनम बागी, सारिका काळे, दिक्षा लोहार, कविता कश्यप, रूचिता रावल, उमा सनदे, नयनतारा लंबे आणि प्रियांका गेळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ झाली असून,अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार असल्याचे शाळेतर्फे सांगण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!