पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
देशभरात मंदिरे भक्तीभावाने उभारली जातात. मात्र एखादा समाज स्वतःची राहती घरे पतसंस्थेत गहाण ठेवून मंदिराचा कळस चढवतो, तेव्हा ती घटना केवळ धार्मिक राहत नाही – ती त्या समाजाच्या स्वाभिमानाचा आणि एकजुटीचा बुलंद आवाज ठरते.हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील माळभागावर वास्तव्यास असलेल्या भटक्या गोपाळ समाजाने अशीच प्रेरणादायी कर्तृत्वगाथा घडवली आहे.पारंपरिक ‘बँजो (वाजंत्री)’ व्यवसाय करणाऱ्या या समाजाने आपल्या कुलदैवत ‘आई काळूबाई’चे मंदिर स्वखर्चातून उभारले आहे.तब्बल २१ लाख ५० हजार रुपये खर्च करून बांधलेले हे मंदिर केवळ विटा-मातीचे बांधकाम नाही,तर त्यात प्रत्येक कुटुंबाचा त्याग,श्रद्धा आणि संघर्ष गुंफलेला आहे. मंदिर उभारणीसाठी शिरोली येथील एका पतसंस्थेकडून १५ लाखांचे कर्ज घेण्यात आले, तर उर्वरित रक्कम वस्तीतील प्रत्येक व्यक्तीकडून एक हजार रुपये वर्गणी स्वरूपात जमा करण्यात आली.या मंदिराचा कळस १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभदिनी चढविण्यात येणार असून, २० फेब्रुवारी रोजी आई काळूबाईच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना होणार आहे.संपूर्ण वस्तीमध्ये सध्या उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.पुलाची शिरोलीतील या गोपाळ वस्तीत सुमारे ४७० नागरिक आपल्या कुटुंबांसह गुण्यागोविंदाने राहतात.गावातील इतर समाजांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरे असून तेथे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडतात.मात्र आपल्या समाजासाठी हक्काचे मंदिर नसल्याची खंत गोपाळ समाजाच्या मनात अनेक वर्षे होती. सामाजिक एकत्रिकरणासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागा असावी, या भावनेतून मंदिर उभारणीचा निर्णय घेण्यात आला.विशेष म्हणजे हा निर्णय आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या समाजाने घेतला.हातावर पोट असलेल्या या कुटुंबांकडे एवढी मोठी रक्कम नव्हती.तरीही समाजातील आकाश पवार, लखन जाधव,अमित जाधव,किरण जाधव,पिंटू जाधव आणि सिकंदर जाधव या तरुणांनी पुढाकार घेतला.त्यांनी स्वतःची राहती घरे पतसंस्थेकडे तारण ठेवून कर्ज उचलले.आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार बाजूला ठेवून समाजाच्या स्वाभिमानासाठी घेतलेला हा निर्णय खरोखरच धाडसी ठरला आहे.शिरोली ग्रामपंचायतीने २००५ साली या समाजातील कुटुंबांना १५ बाय २५ आकाराचे ३० प्लॉट उपलब्ध करून दिले होते.मात्र त्यानंतर या समाजाच्या पक्क्या घरांच्या प्रश्नाकडे ठोसपणे लक्ष देण्यात आले नाही.अनेक वर्षे अशिक्षित आणि अल्पसंपन्न अवस्थेत राहिलेल्या या समाजाने गावातील मुख्य प्रवाहापासून काहीसे अंतर राखले होते.परंतु कालांतराने त्यांनी शिक्षण,व्यवसाय आणि सामाजिक जाण यामध्ये प्रगती साधत स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. चार वर्षांपूर्वी एका केंद्रीय मंत्र्यांनी या वस्तीस भेट देऊन कुटुंबीयांसमवेत भोजन घेतले होते. त्यावेळी ‘या लोकांना हक्काची घरे बांधून देऊ’ असे आश्वासनही देण्यात आले होते.मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.तरीही या समाजाने निराश न होता स्वतःच्या बळावर उभे राहण्याचा निर्णय कायम ठेवला.पारंपरिक वाद्यांच्या सुरातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या गोपाळ समाजाने आता सामाजिक एकात्मतेचा आणि स्वाभिमानाचा नवा सूर लावला आहे.‘हक्काची घरे’ मिळवण्यासाठी त्यांचा लढा सुरूच आहे; पण ‘हक्काचे मंदिर’ त्यांनी आपल्या घामातून आणि कष्टातून साकारले आहे.मंदिर उभारणीमुळे समाजात नवचैतन्य संचारले आहे.धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजजागृतीची कामे याठिकाणी राबवण्याचा मानस आहे. त्यामुळे हे मंदिर केवळ श्रद्धास्थान न राहता सामाजिक परिवर्तनाचे केंद्र ठरणार असल्याचे पुलाची शिरोलीतील गोपाळ समाजाने दाखवून दिले.राजकीय आश्वासनांवर अवलंबून न राहता एकजुटीच्या बळावर स्वप्ने साकार करता येतात. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या त्यागाची दखल घेऊन किमान आता तरी पक्क्या घरांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा,हीच या समाजाची रास्त अपेक्षा आहे.आई काळूबाईच्या मंदिराच्या कळसारोहणाच्या निमित्ताने संपूर्ण वस्ती आज अभिमानाने उभी आहे.कारण हे मंदिर त्यांच्या श्रद्धेचेच नव्हे,तर त्यांच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहे.