शिरोळमध्ये शुक्रवारी वीज ग्राहक संवाद मेळावा; नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवादाची संधी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तांत्रिक बिघाड तसेच वीज वितरण व्यवस्थेबाबत वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिरोळ नगरपरिषद आणि महावितरण उपविभागीय कार्यालय, शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने “वीज ग्राहक संवाद मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा शुक्रवार, दि.२४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिरोळ नगरपरिषद कार्यालयात होणार आहे.या संवाद मेळाव्यात शहरातील नागरिक, व्यावसायिक तसेच सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या विविध समस्यांबाबत थेट संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, लो व्होल्टेज, ट्रान्सफॉर्मर बिघाड, वीज मीटरमधील त्रुटी,वाढीव वीज बिले यांसारख्या समस्यांवर मार्गदर्शन आणि तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न या मेळाव्यात केला जाणार आहे. अलिकडच्या काळात शहरात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः व्यापारी आणि लघुउद्योगांना याचा मोठा फटका बसत असून त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या सर्व समस्यांचा आढावा घेऊन नागरिकांना दिलासा देण उपक्रम राबविण्यात येत आहे.मेळाव्यात महावितरणचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेतील व त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देणार आहेत. तसेच भविष्यात वीजपुरवठा अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे.नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे,उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव तसेच नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी शहरातील नागरिक, व्यावसायिक आणि वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.नागरिकांच्या सक्रिय सहभागातून वीज समस्यांवर प्रभावी तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!