अब्दुललाटमध्ये घरकुल लाभार्थी मेळावा संपन्न
अब्दुललाट / प्रतिनिधी
शासनाच्या घरकुल योजना गावातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. मंजूर झालेली घरकुले अपूर्ण राहू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आयोजित घरकुल लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते.आज सोमवारी आयोजित या मेळाव्यास नूतन जिल्हा परिषद सदस्या श्रद्धा गायकवाड, पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे,सरपंच सौ.कस्तुरी कुरुंदवाडे तसेच गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार डॉ. यड्रावकर यांनी गावातील मंजूर, पूर्ण आणि प्रलंबित घरकुलांचा सविस्तर आढावा घेतला.अद्याप सुरू न झालेल्या घरकुलांबाबत कारणे जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. घरकुलासाठी जागेची मालकी, शेतजमिनीतील अडचणी तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता या बाबींची तपासणी काटेकोरपणे करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.शासनाकडून मंजूर होणारी अनुदानाची रक्कम अपुरी पडत असल्याने काही लाभार्थ्यांना घर पूर्ण करताना आर्थिक अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक बँका व पतसंस्थांनी पुढाकार घेऊन एक ते दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे अपूर्ण घरकुले लवकर पूर्ण होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत आमदारांच्या प्रयत्नांतून सुमारे १३०० हून अधिक घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १००० घरांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित सुमारे ३०० घरांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र २१० लाभार्थ्यांच्या नावे जागा नसल्यामुळे ते अद्याप घरकुलापासून वंचित आहेत. जावईनगर, अवचितनगर आणि इंदिरानगर परिसरातील लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी प्रलंबित प्रकरणांचा स्वतंत्र आढावा घेऊन लवकरच अडचणी दूर करण्यात येतील,असे आश्वासन दिले.कार्यक्रमात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, श्रद्धा गायकवाड आणि मिलिंद कुरणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, तरुण मंडळांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यामुळे लाभार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यास गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.