बुबनाळ / प्रतिनिधी
बुबनाळ गावासाठी ऐतिहासिक क्षण ठरावा असा हा काळ आहे. तब्बल ४० वर्षांनंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बुबनाळ गावाला पुन्हा एकदा संधी मिळाली असून, या संधीचे प्रतिनिधित्व करत आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रशांत शहापूरे यांना सर्वत्र मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून,ही केवळ निवडणूक नाही, तर बुबनाळच्या स्वाभिमानाची लढाई आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.प्रशांत शहापूरे यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा समृद्ध आहे.त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब शहापूरे हे दत्त साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन होते.सुमारे ४० वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती.शिक्षण संस्था,सहकारी संस्था,दूध संघ अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले. सर्वसामान्यांचे प्रश्न,अडीअडचणी सोडवणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता.तोच सामाजिक विचार आणि सेवाभावाचा वारसा घेऊन आज प्रशांत शहापूरे मैदानात उतरले आहेत.ग्रामीण भागातील शेतकरी,युवक,महिला, कामगार यांच्या समस्या जवळून जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणे,हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे.ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक नाही, तर समाजासाठी आहे,अशी भावना ते सातत्याने व्यक्त करत आहेत. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत भाजप पक्षानेही त्यांच्यावर विश्वास दाखवत अधिकृत उमेदवारी दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त करताना प्रशांत शहापूरे म्हणाले की, आलास मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते कटिबद्ध राहतील.रस्ते, पाणी,शिक्षण, आरोग्य,शेती व रोजगार या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करून मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.४० वर्षांनंतर मिळालेल्या या ऐतिहासिक संधीमुळे बुबनाळ गावासह संपूर्ण आलास मतदारसंघात नव्या आशा पल्लवित झाल्या असून,प्रशांत शहापूरे यांच्या विजयाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.