ऐन मतदानाच्या तोंडावर काँग्रेस उमेदवाराच्या पतीला हद्दपारीची नोटीस; दत्तवाडमध्ये खळबळ

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी 

दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना ऐन मतदानाच्या तोंडावर हद्दपारीची नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.मंगळवारी रात्री उशिरा पोलीस प्रशासनाकडून ही नोटीस देण्यात आली.त्यानंतर आज बुधवार,दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उदय पाटील यांना हद्दपार झाल्याने घर सोडावे लागले.या घटनेमुळे दत्तवाड मतदारसंघात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.उदय पाटील घरातून बाहेर पडताना त्यांची पत्नी दीपाली पाटील, मुले तसेच परिसरातील शेकडो नागरिक भावूक झाले होते. अनेकांनी यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.ऐन मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अशी कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे.यावेळी उदय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना,आमचा विजय निश्चित दिसत असल्याने सत्तेचा गैरवापर करून विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचले आहे. यापूर्वी कधीही अशी नोटीस देण्यात आली नव्हती.मात्र मतदानाच्या तोंडावरच कारवाई करून मतदारसंघात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप केला.दरम्यान,काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांच्या समर्थनार्थ दत्तवाड मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने एकवटले आहेत.या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराला जनता मतपेटीतूनच उत्तर देईल, असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. महिलांसह युवक वर्गामध्येही या घटनेविरोधात तीव्र नाराजी दिसून येत आहे.या संपूर्ण प्रकारामुळे दत्तवाड मतदारसंघातील निवडणूक अधिकच तापली असून, सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेचा मतदानावर नेमका काय परिणाम होतो,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!