साहेब आमचं काय चुकलं..पैसा झाला मोठा, कार्यकर्ता झाला छोटा!’ शिये परिसरात उपरोधिक बॅनरबाजी; निष्ठावंतांच्या डावलण्यावरून संताप.
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, याच काळात पक्षासाठी वर्षानुवर्षे रक्त आटवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, ऐनवेळी आलेल्या धनदांडग्या ‘उपऱ्या’ उमेदवारांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याचाच प्रत्यय कोल्हापूर शहराजवळील शिये गावात व परिसरात पाहायला मिळत असून, तिथे लागलेल्या उपरोधिक बॅनरने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
बॅनरवरील मजकूर चर्चेत
शिये परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरवर “पैसा झाला मोठा, कार्यकर्ता झाला छोटा!” असा मथळा देण्यात आला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवली, सुख-दु:खात पक्षाची साथ दिली, त्यांना उमेदवारीच्या शर्यतीत बाजूला सारून केवळ ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आणि ‘आर्थिक ताकदी’च्या जोरावर आयात केलेल्या उमेदवारांना झुकते माप दिल्याचा आरोप या माध्यमातून करण्यात आला आहे.
निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत पक्षांतराचे वारे वाहत आहेत. अनेक पक्षांनी दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना तातडीने उमेदवारी जाहीर केली आहे.
या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला संधी मिळेल असे ठामपणे विश्वास असणाऱ्या. कार्यकर्ते डावलले गेले त्यामुळे यावेळी ही संधी नाही. ही सल अनेक स्थानिक नेते १०-२० वर्षांपासून उमेदवारीची वाट पाहत होते त्यांच्यातुन व्यक्त होत आहे ..
उपऱ्यांचे वर्चस्व: केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येते, असा समज पक्षांच्या धुरिणांनी करून घेतल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
प्रचारावर बहिष्कार?
या बॅनरबाजीमुळे आता कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने विरोधात काम करण्याचा किंवा प्रचारापासून लांब राहण्याचा पवित्रा घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यात जोरदार चर्चा
शिये परिसरात लागलेले हे बॅनर सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. “ही केवळ एका गावाची गोष्ट नसून संपूर्ण जिल्ह्याची हीच स्थिती आहे,” अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. पक्षश्रेष्ठींनी वेळीच या नाराजीची दखल घेतली नाही, तर ‘निष्ठावंत विरुद्ध उपरे’ हा लढा निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम करू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.”आम्ही सतरंज्या उचलायच्या आणि निवडून दुसऱ्यांनीच यायचे का?” असा उद्विग्न सवाल आता सामान्य कार्यकर्ता विचारू लागला आहे.