कुरुंदवाड / प्रतिनिधी
नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड येथील एनसीसी विभागासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी कामगिरी करत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर आदर्श झेले याची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली आहे.या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण कुरुंदवाड परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आदर्शवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आदर्श झेले हा श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता.शिक्षणासोबतच शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्वगुण जोपासणाऱ्या राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) मध्ये तो सक्रियपणे सहभागी होता. सध्या तो एनसीसीमध्ये सीनियर अंडर ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत होता.मेहनत,चिकाटी आणि जिद्द या गुणांच्या जोरावरच आदर्शने भारतीय सैन्य दलात निवड मिळवत आपले स्वप्न साकार केले आहे.या महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातून यापूर्वीही अनेक विद्यार्थी भारतीय सैन्य दल,पोलीस दल व विविध संरक्षण सेवांमध्ये कार्यरत आहेत.नुकत्याच झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत एक्स कॅडेट अथर्व पाटील, विश्वजित भेंडे व समर्थ कोळी यांचीही भारतीय सैन्य दलात निवड झाली असून ही बाब महाविद्यालयाच्या शैक्षणिक व शिस्तबद्ध परंपरेची साक्ष देणारी आहे.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे.पाटील यांनी केले. या सर्व यशस्वी एनसीसी कॅडेट्सना लेफ्टनंट श्री.व्ही.एस.थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे विद्यमान संचालक गौतमभाऊ पाटील, उपसंचालक डी.एस.माने,शाखेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.ही निवड महाविद्यालयासाठी गौरवास्पद असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.