शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात सध्या राजकीय वातावरण तापले असून केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला तालुकास्तरावर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जयसिंगपूर,शिरोळ व कुरुंदवाड नगरपरिषद क्षेत्रात भाजपला मिळालेल्या अपयशामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक सुरू झाली असून मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप कोणताही ठोस निरोप अथवा मार्गदर्शन न आल्याने संभ्रमाची अवस्था अधिकच वाढली आहे.भाजपकडून अपेक्षित भूमिका स्पष्ट न झाल्यामुळे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार यड्रावकर गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय घडामोडींचा वेग वाढला असून काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व उबाठा गटाने उमेदवारांची तयारी जवळपास पूर्ण केली आहे.दुसरीकडे आमदार यड्रावकर गट व भारतीय जनता पार्टी यांच्यात महायुती होणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही.या अनिश्चिततेचा थेट परिणाम भाजपच्या स्थानिक संघटनात्मक बांधणीवर होताना दिसत आहे.तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत असून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.याच पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर गटाने मात्र निवडणूक तयारीला वेग दिला असून संभाव्य उमेदवारांच्या गाठीभेटी,बैठका व मतदारसंवाद सुरू केले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही ठोस हालचाल किंवा दिशा न दिल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे.आगामी काही दिवसांत भाजपकडून निर्णय न झाल्यास शिरोळ तालुक्यात मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर निश्चितच होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.