जि प – पं स निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलली
शिरोळ / प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी चाचपणीला वेग दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे पक्ष एकत्र आले असून जागावाटपाचा फॉर्म्युलाही नुकताच जाहीर करण्यात आला आहे.मात्र या नव्या आघाडीतील काही निर्णयांमुळे शिरोळ तालुक्यात शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. दरवर्षी गळीत हंगामाच्या आधी ऊस दरासाठी आक्रमक भूमिका घेणारे आणि साखर कारखानदारांविरोधात आंदोलनाची भाषा करणारे नेते आता थेट कारखानदारांसोबत बैठका घेत असल्याने गरजवंत शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.गेली अनेक वर्षे दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहिलेले राजू शेट्टी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मात्र कारखान्यावर वारंवार फेऱ्या मारत असल्याची चर्चा शेतकरी वर्तुळात सुरू आहे. ऊस दराच्या आंदोलनादरम्यान पोलिस यंत्रणा व कार्यकर्त्यांचा वापर करून आंदोलने मोडून काढणाऱ्या साखर कारखानदारासोबत बैठका होत असल्याने विशेषतः युवा शेतकरी वर्गात नाराजी वाढली आहे.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची भूमिका घेणारे नेते सत्तेसाठी तडजोड करत असतील,तर शेतकऱ्यांनी याचा जाब विचारणे आवश्यक आहे अशी भावना अनेक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत हा असंतोष मतपेटीतून व्यक्त होईल,असा इशारा शेतकरी वर्गाकडून दिला जात आहे.दरम्यान, या राजकीय घडामोडींमुळे शिरोळ तालुक्यातील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.