महापुरातील ‘रक्षक’ सदाशिव आंबी यांच्या साहसाला रोटरी क्लबचा सलाम

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

निसर्गाचा कोप जेव्हा अक्राळविक्राळ रूप धारण करतो, तेव्हा सर्वसामान्यांची पाचावर धारण बसते. पण अशाच कठीण समयी काही व्यक्तिमत्त्वे स्वतःच्या प्राणाची बाजी लावून ‘माणुसकीचा दिवा’ तेवत ठेवतात. गेल्या तीन २००५, २०१९ आणि २०२१ च्या विनाशकारी महापुरामध्ये आपली साधी लाकडी नाव घेऊन हजारो जीवांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या सदाशिव बापु आंबी यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत कोल्हापुरातील रोटरी क्लबच्यावतीने त्यांचा विशेष सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.२००५ चा पूर असो किंवा २०१९ आणि २०२१ चे प्रलयंकारी संकट, जेव्हा रस्ते पाण्याखाली गेले होते आणि मदतीची यंत्रणा पोहोचणे कठीण होते, तेव्हा सदाशिव आंबी हे आपली नाव घेऊन बाहेर पडले. पाण्याची पातळी वाढत असताना घरांच्या छतावर अडकलेल्या वृद्धांना, महिलांना आणि बालकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम त्यांनी अहोरात्र केले. केवळ मानवाचंच नव्हे, तर पुरात वाहून जाणाऱ्या गोठ्यातील जनावरांना आणि इतर मुक्या प्राण्यांनाही त्यांनी जीवदान दिले. “प्रत्येक जीव मोलाचा असतो,” ही त्यांची भावना अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. प्रशासकीय मदतीची वाट न पाहता, सलग कित्येक तास वल्हवत राहून त्यांनी हजारो कुटुंबांना पुन्हा एकत्र आणले.सदाशिव आंबीच्या या निस्वार्थी सेवेचा गौरव करण्यासाठी रोटरी क्लबकडून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सदाशिव‌ आंबी‌ सारखी माणसे समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत.जिद्दीने त्यांनी मानवता धर्म जपण्याकरिता आपला जीव धोक्यात घालून जनतेला सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न केला.असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.सत्कारला उत्तर देताना सदाशिव आंबी म्हणाले, मी काही मोठे काम केले नाही, माझ्याकडे नाव होती आणि लोक संकटात होते. जे मला शक्य होते ते मी केले.लोकांचे आशीर्वाद हीच माझी खरी कमाई आहे. असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!