हलोंडी–सांगली फाटा येथे एस.टी.प्रवासी सुविधांसाठी निवेदन

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

हलोंडी परिसर वेगाने विकसित होत असून तो घाऊक कापड खरेदी, टाइल्स, मार्बल, फर्निचर तसेच सर्व प्रकारच्या घरगुती वस्तूंसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. यासोबतच हलोंडी येथे असलेली राजेंद्र विद्या मंदिर शाळा दहावीपर्यंतचे शिक्षण देणारे केंद्र असून आजूबाजूच्या गावांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध भागांतून व्यापारी व नागरिक खरेदीसाठी या परिसरात येत असल्याने प्रवासी वाहतुकीची गरज लक्षणीयरीत्या वाढली आहे.या पार्श्वभूमीवर सांगली फाटा व हलोंडी परिसरात एस.टी. बसथांबा तसेच प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत टीटीसी चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) कोल्हापूर विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले.टीटीसी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी निलेश चौगुले व गणपती चौगुले (निवृत्त IRS) यांनी विभागीय उपव्यवस्थापकांची भेट घेऊन हलोंडी परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक व शैक्षणिक विकास, प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच सांगली फाट्यावरील वाढती वाहतूक कोंडी याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी विभागीय उपव्यवस्थापकांनी या समस्यांची दखल घेत एमएसआरटीसीकडून शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच सार्वजनिक हित, व्यापारी वर्ग व विद्यार्थी वर्गाच्या सोयीसाठी टीटीसी चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेऊन आवश्यक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.या उपक्रमासाठी हलोंडी ग्रामपंचायत, शिरोली परिसर तसेच राजेंद्र विद्या मंदिर शाळा यांच्याकडून सहकार्य मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.हलोंडी येथे अधिकृत एस.टी. बसथांबा, प्रवाशांसाठी शेड तसेच सांगली फाटा येथे नियोजित बस हॉल्ट एरिया व बुकिंग काउंटर सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास टीटीसी चॅरिटेबल ट्रस्टने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!