अवैध अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई, ५ किलो गांजासह सांगलीतील आरोपी अटकेत

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले होते.त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी प्रभावी कारवाई करत सांगली जिल्ह्यातून गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमास अटक केली आहे.या कारवाईत आरोपीकडून ५ किलो गांजा, एक मोबाईल हँडसेट आणि गांजा विक्रीसाठी वापरण्यात आलेली स्प्लेंडर दुचाकी असा एकूण १ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती.यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जयसिंगपूर येथील चिपरी फाटा परिसरात एक इसम मोटरसायकलवरून गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने चिपरी फाटा परिसरात सापळा रचला.संशयित इसम स्प्लेंडर मोटरसायकलवरून येताना दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.चौकशीत त्याने आपले नाव वैभव राजाराम आवळे (वय २६ रा.मिरज,जि. सांगली) असे सांगितले.दोन पंचांच्या उपस्थितीत केलेल्या अंगझडतीत त्याच्याकडे ५ किलो गांजा,मोबाईल हँडसेट व दुचाकी आढळून आली.सदर गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस.कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न,दरोडा, आर्म अॅक्टसह एकूण आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.

Leave a Comment

error: Content is protected !!