नांदणी येथे जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर वाहतूक; चार टन मांसासह ट्रक जप्त

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

नांदणी (ता. शिरोळ) येथे रविवारी दुपारी जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर शिरोळ पोलिसांनी कारवाई करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे चार टन जनावरांचे मांस व ट्रक असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आयुब मौला जमादार (वय ३६, रा.जवाहरनगर, इचलकरंजी) व मेहबुब आलम रा. सारथीनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भातील फिर्याद प्रल्हाद लक्ष्मण आंबी (वय ५९ रा.नांदणी, ता. शिरोळ) यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदणी परिसरात निळ्या रंगाच्या कॅरेटमध्ये जनावरांचे मांस एका ट्रकमध्ये भरले जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली.संशय आल्याने नागरिकांनी संबंधित ट्रक अडवून याबाबत तात्काळ शिरोळ पोलिसांना कळवले.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारचाकी टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रकवर (क्रमांक एमएच ४३ बीपी ४९६२) छापा टाकला.तपासादरम्यान ट्रकमध्ये सुमारे चार टन जनावरांचे मांस निळ्या रंगाच्या कॅरेटमध्ये भरलेले आढळून आले.मांस वाहतुकीसाठी आवश्यक कोणतीही वैध कागदपत्रे आरोपीकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी अंदाजे ११ लाख रुपये किमतीचे जनावरांचे मांस व सुमारे ५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा मुद्देमाल जप्त केला.दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मांस व वाहनाचा पंचनामा करण्यात आला असून मांसाचे नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात येणार आहेत.नेमके मांस कोणत्या जनावरांचे आहे, याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!