शिरोळ / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्र कामेरी, जिल्हा सांगली व सुनंदा जाधव कन्या ज्युनिअर कॉलेज, कामेरी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कर्मवीर शिक्षण संस्था, कामेरीचे संस्थापक सचिव प्रा. अनिल (दादा) पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कामेरी येथील कु.शांभवी श्रीकांत माळकर हिने ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक पटकावला,तर कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर हिने सीनिअर गटात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील सांगली, सातारा,कोल्हापूर, पुणे, मुंबई, नांदेड, नागपूर आदी विविध जिल्ह्यांतील सुमारे ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या व दर्जेदार झालेल्या या स्पर्धेत दोन्ही गटांतून कामेरीच्या कन्यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.ज्युनिअर गटातील प्रथम क्रमांकाची मानकरी कु. शांभवी माळकर ही रयत शिक्षण संस्थेच्या श्री पद्माराजे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी असून तिने “सोशल मीडिया व आजचा युवक” या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावी, अभ्यासपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने मांडले. तिच्या मुद्देसूद मांडणीला परीक्षक व उपस्थितांची विशेष दाद मिळाली.सीनिअर गटात प्रथम क्रमांक पटकावणारी कु. प्रज्ञा माळकर ही सांगली येथील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने “संवाद सुंदर जगण्याचा… नात्यांच्या समृद्धीचा” या विषयावर अत्यंत भावपूर्ण व प्रभावी वक्तृत्व सादर केले.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दोघींनाही त्यांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य व सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण,सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कु.शांभवी व कु.प्रज्ञा माळकर यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व वक्तृत्व क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.