तेरवाड येथे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

नवभारत शिक्षण मंडळ,सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड यांच्यावतीने तेरवाड (ता. शिरोळ) येथे राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ उत्साहात झाला.ग्रामपंचायत मौजे तेरवाड येथे मान्यवरांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे.पाटील यांनी केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,महाविद्यालयाच्या स्थापनेपासून परिसरातील खेड्यापाड्यांशी असलेले ऋणानुबंध आजही तितकेच दृढ आहेत.परिसरातील नागरिकांकडून महाविद्यालयास वेळोवेळी सहकार्य लाभत असून, त्या सहकार्याच्या बळावरच असे उपक्रम यशस्वीपणे राबविता येतात.या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’ नेण्याचा आमचा मानस असून, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक शिबिरकाळात विविध स्वच्छता व सामाजिक उपक्रम राबविणार आहेत.यासाठी सहकार्य करणाऱ्या तेरवाड ग्रामपंचायत, पदाधिकारी,सामाजिक संस्था,सहकारी संस्था व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.सात दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावाची स्वच्छता,पर्यावरण संवर्धन,जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच विविध व्याख्याने,सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिरातील सर्व स्वयंसेवकांच्या निवासाची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे.यावेळी बाबासाहेब नदाफ यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात श्रमदानाचे महत्त्व विशद करत महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वसा पुढे नेण्यासाठी अशा श्रमसंस्कार शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले.संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.या कार्यक्रमास सरपंच पौर्णिमा गोंधळी, उपसरपंच विजय गायकवाड,जालिंदर शांडगे, लक्ष्मी घटनटे, संजय अनुसे, कृषी उत्पन्न बाजार समिती जयसिंगपूरचे सभापती, शीतल गायकवाड,अमोल खोत, प्राचार्य आर.जे.पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख ए.वाय. कुंभार,सहाय्यक आर.आर. टाकमारे,एस.डी.भोजे, सौ.जे.एम.पाटील यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!