शिरोळच्या शाश्वत विकासासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक – पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

भारतीय लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेने नेहमीच शिरोळ शहराच्या विकासात्मक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.यापुढील काळातही शिरोळच्या शाश्वत विकासासाठी सर्व पत्रकार बंधूंचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन शिरोळचे नूतन नगरसेवक व यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले.शिरोळ नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन यादव पॅनलने एकतर्फी सत्ता काबीज केली आहे.या निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवलेल्या यादव पॅनलचे नेते पृथ्वीराजसिंह यादव व शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ.योगिता सतीश कांबळे यांचा शिरोळ शहर पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभात ते बोलत होते.पत्रकार संघाच्यावतीने पृथ्वीराजसिंह यादव,नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे तसेच सौ.ज्योत्स्ना यादव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.पाटील,उपाध्यक्ष बाळासाहेब माळी,सचिव डॉ.दगडू माने,खजिनदार चंद्रकांत भाट,तसेच सदस्य महेश पवार,संदीप बावचे, बाळासाहेब कांबळे,संदीप इंगळे,दिलीप उर्फ दिवाण कोळी उपस्थित होते.यावेळी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.पाटील म्हणाले की, नगरपालिकेच्या माध्यमातून शिरोळ शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास योजना व कामांना पत्रकार संघाचे सदैव सहकार्य राहील.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पत्रकारिता करताना प्रशासनाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार संघ करेल,असेही त्यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराजसिंह यादव यांनी आपल्या भाषणात शिरोळमधील पत्रकारांच्या भूमिकेचे कौतुक करताना सांगितले की,येथील पत्रकारांनी नेहमीच चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची परंपरा जपली आहे. समाजाच्या प्रगतीसाठी पत्रकारांनी वेळोवेळी परखड भूमिका घेतली असून शहराच्या विकासाला नेहमीच त्यांची साथ लाभली आहे. यापुढील काळातही शिरोळ शहराचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून प्रगती साधण्यासाठी पत्रकार बंधूंनी सहकार्याची भूमिका ठेवावी,असे त्यांनी आवाहन केले. पत्रकारांच्या सूचना व संकल्पना समजून घेऊन त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न राहतील,असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे स्वागत पत्रकार संघाचे सचिव डॉ. दगडू माने यांनी केले,तर उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!