कोल्हापूर जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धा शिरोळ येथे उत्साहात संपन्न

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व कै.दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ, दत्तनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कै.श्रीमती कृष्णामाई आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त तसेच कै. किरण पाटील (कणंगलेकर) यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली.स्पर्धेचे उद्घाटन दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रफुल मांगोरे–पाटील, शिरोळ नगरपरिषदेच्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष योगिता कांबळे यांच्यासह नूतन नगरसेवक ओंकार माने–गावडे, संतोष बेनाडे, नवनाथ पुजारी (सर), सुहास बेळुंके, आश्विनी मांगोरे–पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या क्रॉस कंट्री स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून एकूण १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विविध वयोगटांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी सादर करत आपली सहनशक्ती, वेग आणि शिस्तबद्ध खेळाचे दर्शन घडवले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.स्पर्धेच्या शेवटी सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व खेळाडूंचेही आयोजकांच्या वतीने कौतुक करण्यात आले.या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील ॲथलेटिक्स क्रीडेला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ओंकार कोळी, ऋतुराज काटकर, प्रथमेश कोळी, बालम ढालाईत, श्रेयश माने, संचित बंडगर, धनंजय चव्हाण तसेच डी. के. टी. स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे व सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. 

Leave a Comment

error: Content is protected !!