“या” नगरपंचायतीच्या प्रभागातील लढतीवर ५ लाखांची पैज, पंचक्रोशीत चर्चेला उधाण

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असून उर्वरित नगरपालिकांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यानंतर अवघ्याच दुसऱ्या दिवशी, २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याने सर्वत्र प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.निवडणूक पार पडलेल्या नगरपालिकांमधील कार्यकर्त्यांची प्रतीक्षा वाढली असून,अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये ईर्षा आणि चुरस पाहायला मिळत आहे. निकालाबाबत अंदाज बांधत अनेक भागांत लाखोंच्या पैजा लागल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक दहामधील निवडणूक सध्या विशेष चर्चेत आहे.या प्रभागात मामा – भाच्याच्या थेट लढतीमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.या लढतीत विजय मिळवण्यासाठी थेट पाच लाख रुपयांची पैज लावण्यात आल्याची माहिती समोर आली असून, त्याची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे.हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रभाग १० मधून काँग्रेसकडून सागर शामराव पुजारी तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून रणजित बिरू धनगर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.या प्रभागात पाण्यासारखा पैसा खर्च झाल्याची चर्चा असून,अखेर बाजी कोण मारणार याबाबत गुलरस्त्यात जोरदार चर्चा सुरू आहे.सुरुवातीला तीन तारखेला निकाल जाहीर होणार होता,मात्र तो पुढे ढकलून आता २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे.या लढतीत रणजित धनगर यांच्या विजयासाठी अक्षय विश्वास माने यांनी तर सागर पुजारी यांच्या विजयासाठी संताजी लक्ष्मण धनगर यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची पैज लावल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे,या पैजेचा पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा करण्यात आला असून सदर रक्कम पंचासमक्ष रोखीने सौ.दिपाली प्रकाश ठोंबरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.निकालानंतर पैजेतील विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्याला ही रक्कम दिली जाणार आहे. दरम्यान,दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजयी होणार असा दावा करत असून,हातकणंगले नगरपंचायतीच्या या प्रभागातील निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!