शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपालिकेच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशांच्या जोरावर मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यावेळी मतदार कडवे प्रत्युत्तर देणार असल्याची चर्चा प्रभागात जोरदार सुरू आहे.पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात येणारा ब्लिचिंग पावडरचा ठेका आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर घेऊन गेल्या ३ वर्षांत मोठी आर्थिक कमाई एका उमेदवाराने केली आहे.त्याच पैशाचा वापर करून पुन्हा निवडणुकीत मतदारांना प्रलोभने देत सत्ता मिळवण्याच्या तयारीत तो उमेदवार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या पाणी शुध्दीकरण प्रक्रियेतील ब्लिचिंग पावडर पुरवठ्याचा गैरवापर होत असल्याची तक्रार अनेकांनी पूर्वी केली होती. मात्र यामागील आर्थिक व्यवहार आता उघडकीस येऊ लागल्याने प्रभागात संताप उसळला आहे.आमच्या आरोग्याचा खेळ करून, चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशातून मतं विकत घेण्याचा प्रयत्न आम्ही मान्य करणार नाही,असा सूर मतदारवर्गात उमटताना दिसत आहे.प्रभाग ३ मध्ये जनतेचा उद्रेक पाहता, मतदार यावेळी योग्य धडा शिकवतील,असा विश्वास स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांत विकासकामे करत असताना काहीजण मात्र ठेक्यांमधून प्रचंड पैसा गोळा करीत असल्याचे नागरिक सांगतात. विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी ठेके घेतले जात होते, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने दिली.या घडामोडींमुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाही मोठा फटका बसू शकतो,असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.प्रभाग ३ मधील नाराजी इतर प्रभागांपर्यंत पोचत असून,संपूर्ण शहरात याबाबत चर्चा रंगली आहे.निवडणुकीत प्रामाणिक नेतृत्व हवे, विकास हवा अशा मागण्यांमुळे गैरव्यवहार करणाऱ्या उमेदवारांवर नागरिक यावेळी कठोर निर्णय घेतील,अशी शक्यता व्यक्त होत आहे.शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार जागृत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून,त्यामुळे अनेक उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.या प्रकरणाचा पुढील राजकीय घडामोडींवर नक्कीच परिणाम होणार आहे.