शिरोळ शहरात जयसिंगपूरच्या सहाव्या गल्लीचा वाढता राजकीय प्रभाव ?

Spread the love

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गजबजलेल्या चर्चा

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहराचे राजकारण सध्या जयसिंगपूर शहरातील सहाव्या गल्लीतून नियंत्रित होत असल्याच्या चर्चा शहरात जोर धरू लागल्या आहेत.येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गल्लीतून शिरोळच्या उमेदवारांना आर्थिक व धोरणात्मक पाठबळ दिले जात असल्याची चर्चा रंगू लागल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.शिरोळ नगरपालिकेत कोण सत्ता स्थापन करणार,आगामी निवडणुकीत जनतेचे नेतृत्व कोणाकडे जाणार आणि स्थानिक निर्णयांचा ताबा कोणाकडे असेल,यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण,सध्या शिरोळमधील काही लोकप्रतिनिधींना जयसिंगपूरमधील “चेअरमन व मालक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींना भेटल्याशिवाय अनेक कामांना गती मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.या आर्थिक पाठबळामागे भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांची आखणी असल्याचा दावा काही स्थानिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.विधान परिषद,जिल्हा बँक,तसेच गोकुळ दूध संघातील संचालकमंडळातील पदे आपल्या घरात राखण्यासाठी शिरोळ,जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा राजकीय पातळीवर सुरू आहेत.या तिन्ही नगरपालिकांत आपली पकड मजबूत ठेवून जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेत्यांवर राजकीय दडपण निर्माण करण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती मिळते.शिरोळ शहरात या चर्चांना अधिक जोर मिळत असून नागरिकही या विषयावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.काहींना या रणनीतीमागील आर्थिक सामर्थ्य चिंताजनक वाटते,तर काहींना हे सध्याच्या राजकीय वातावरणातील सामान्य गणित असल्याचे मत आहे.मात्र,या सर्व घडामोडींमुळे नगरपालिका निवडणुकीचे राजकारण अधिक रंगतदार होणार एवढे मात्र निश्चित.आता शिरोळच्या मतदारांनी या चर्चांकडे कसा पाहिले जाणार आणि अंतिमतः नेतृत्वाची धुरा कोणाच्या हातात जाणार, हे येणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!