शाहू आघाडीचे सर्व उमेदवार प्रामाणिक, कर्तबगार आणि विकासाभिमुख – अमरसिंह पाटील 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीला प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण तालुक्यात या आघाडीची मजबूत पकड असल्याचे चित्र दिसू लागले आहे.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विकासकामांचा भक्कम पायाभूत वारसा निर्माण झाला असून याच कामगिरीच्या जोरावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.श्वेता काळे तसेच प्रभागातील सर्व उमेदवारांना मतदारांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.प्रभागात घरगुती भेटीत नागरिकांनी राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे स्वागत करत उत्साहाने पाठिंबा दर्शविला.प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा,स्वच्छता,ड्रेनेज व्यवस्थापन,शैक्षणिक सुविधा आणि नागरिकांना मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याच्या कामांमध्ये अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेने केलेली प्रगती नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता आली आहे.त्यामुळे ‘विकासाच्या जोरावर राजर्षी शाहू आघाडी’ हा संदेश मतदारांमध्ये दृढ होताना दिसत आहे.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.श्वेता काळे यांनी मतदारांशी संवाद साधताना,शहराचा संतुलित आणि सर्वसमावेशक विकास हा आमचा मुख्य अजेंडा असून महिलांसाठी सुरक्षितता, युवकांसाठी रोजगारसंधी,तसेच वंचित घटकांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे सांगितले.त्यांच्या या भूमिकेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी सांगितले की,शहरातील विकासाचे काम थांबू न देता ते अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी सक्षम व अनुभवी पथकाची निवड महत्त्वाची आहे.राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार हे प्रामाणिक, कर्तबगार आणि विकासाभिमुख आहेत.त्यामुळे शिरोळची सुज्ञ जनता आमच्या सोबत ठामपणे उभी आहे. प्रभागातील महिला,युवा आणि ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेल्या प्रत्यक्ष भेटीतही राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांविषयी सकारात्मक भावना व्यक्त केल्या.अनेक ठिकाणी उमेदवारांचे स्वागत फटाके, पुष्पहार आणि घोषणांनी करण्यात आले.या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडी मजबूत यश मिळवेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!