शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम दिवसेंदिवस रंगत चालला असून,फोडाफोडीच्या राजकारणासह निष्ठावंतांना उमेदवारी देताना प्रमुख आघाड्यांतील नेत्यांची मोठी कसोटी लागली आहे.या पार्श्वभूमीवर “रावसाहेब पाटील काय करणार?” हा प्रश्न सध्या शिरोळ शहराच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.शहरातील आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी,ताराराणी आघाडी आणि यादव आघाडी या तीन प्रमुख आघाड्यांमध्ये त्रिकोणी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रत्येक आघाडीने आपापले गट बांधण्यास सुरूवात केली असून, उमेदवार निश्चित करताना आर्थिक बळ आणि गट्टा मतदान हेच दोन प्रमुख घटक ठरत आहेत.त्यामुळे उमेदवारी निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे.दरम्यान,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचे विश्वासू आणि प्रभाग क्रमांक दोन मधील कार्यकर्त्यांमध्ये भक्कम पायाभूत संघटन उभे करणारे रावसाहेब पाटील (मलिकवाडे) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.त्यामुळे त्यांच्या राजकीय निर्णयावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.पाच वर्षांपूर्वीच्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून चांगली लढत देत अल्पमताने पराभव स्वीकारला होता.मात्र,त्या पराभवानंतरही त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून प्रभागात सक्रिय राहून नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवला आहे. आता पुन्हा निवडणुकीची चाहूल लागल्याने रावसाहेब पाटील यांच्या गटात चैतन्य पसरले आहे.त्यांच्या समर्थकांकडून राजर्षी शाहू विकास आघाडीतून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मात्र,अंतिम निर्णयाबाबत रावसाहेब मौन बाळगून आहेत.त्यांच्या भूमिकेकडे शहरातील सर्व राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले असून,ते कोणत्या आघाडीतून उमेदवारी स्वीकारतात यावर शिरोळ नगरपरिषदेतील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार,रावसाहेब पाटील हे आपल्या समर्थकांच्या सल्ल्यानुसार लवकरच निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे शिरोळमधील आगामी निवडणुकीचे राजकारण आणखी रंगतदार बनले आहे.