मुंबई / प्रतिनिधी
अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पूरग्रस्त स्थितीला सामोरे जावे लागेल,अशी ठाम भूमिका माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर आज मुंबई येथे बैठकीत मांडली.या बैठकीत शिरोळ तालुक्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला संभाव्य धोका समजावून सांगताना उल्हासदादा पाटील व माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी सखोल कागदपत्रे सादर केली.अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास २०१९ मधील प्रमाणे पूरस्थिती उद्भवू शकते आणि त्यात शेतकरी,व्यापारी, तसेच सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल,असा इशारा त्यांनी दिला.तसेच महापुरातील आपल्या व्यथा आणि अनुभव जलसंपदा मंत्री व उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडले.या चर्चेमध्ये जलसंपदा विभागाने याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत दिले.माजी आमदार उल्हासदादा पाटील पुढे म्हणाले की,शिरोळ तालुक्यासह परिसरातील लोकांच्या हितासाठी अलमट्टीच्या उंचीवाढीविरोधात संघर्ष सुरूच राहील.पूर नियंत्रणासाठी वैज्ञानिक आणि भौगोलिक अभ्यासावर आधारित निर्णय घेणे गरजेचे असल्याचे निवेदन मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले.