शिरोळ / प्रतिनिधी
यावर्षी सर्वत्रच उष्म्याने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या जनतेला भर उन्हात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी शिरोळ तहसील कार्यालयात वाॅटर फिल्टर ठेवण्यात आला आहे. पण त्यामध्ये पाणी नसल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे.याकडे तालुक्याचे प्रमुख तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी जातीने लक्ष घालून तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिरोळ तालुक्यातील जनतेला तहसील कार्यालयात कामानिमित्त आल्यानंतर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता शुद्ध पाण्याचा वाॉटर फिल्टर बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.या उपक्रमाचे उद्घाटन विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दिमाखात करण्यात आले. प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर काही दिवस ही व्यवस्था सुरळीत सुरू होती.कालांतराने संबंधितांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वाॅटर फिल्टरमध्ये पाणी नसल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली.भर उन्हात पाण्याअभावी नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. नाईलाजाने १०-२० रुपये खर्च नागरिकांना हॉटेलमधून पिण्यासाठी पाण्याची बाटली विकत घ्यावी लागत आहे.
शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा नागरिकांनाच उपयोग होत नाही.यामुळे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देऊन तालुक्यातून येणाऱ्या जनतेला उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरीत आहे.