आयुष्याच्या प्रवासात वेदना सोसल्या पण प्रत्येक माणसाने उभारी दिली – आमदार डॉ.अशोकराव माने

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

गेली ४५ वर्षे सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रात काम करत असताना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार आणि शिरोळ गावच्या जनतेने भरभरून प्रेम केले आहे. हातकणंगलेकरांनी दिलेली साथ, नेत्यांचा आशीर्वाद आणि शिरोळकरान दिलेल्या पाठबळामुळे मी हातकणंगले मतदार संघातून आमदार झालो आहे. माझ्या नागरी सत्काराच्या निमित्ताने शिरोळ गावाने एकीचे दर्शन घडवले असून शिरोळकरांच्या कायम ऋणात राहीण असा आशावाद आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी व्यक्त केला.

 

 

 

येथील शिवाजी चौकात हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून शिरोळचे सुपुत्र दलित मित्र डॉ अशोकराव माने हे प्रचंड मताधिक्य घेऊन आमदार पदी निवडून आल्याबद्दल शिरोळकरांच्या वतीने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने हे बोलत होते.

 

 

 

येथील जय भवानी चौक ते शिवाजी चौकापर्यंत आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांची पारंपारिक वाद्याच्या गजरात शोभेच्या दारूची आकर्षक आतिषबाजी करत आणि शिरोळकर नागरिकांच्या उपस्थितीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने व सौ रेखादेवी माने यांचा मानपत्र चांदीची तलवार देऊन मानाचा फेटा बांधून पुष्पहार अर्पण करून नागरी सत्कार करण्यात आला.

 

 

 

यावेळी बोलताना आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने म्हणाले की आयुष्याच्या प्रवासात अनेक वेदना सोसल्या पण प्रत्येक माणसाने साथ देऊन मला उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसेवेच्या कार्यात काम करण्याचे बळ मिळत गेले. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व शिरोळकरांचे मिळालेले आशीर्वाद आणि आमचे नेते डॉ विनय कोरे आणि हातकणंगलेकरांनी दिलेले साथ वरिष्ठ नेत्यांनी दिलेले पाठबळ यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून दोन नंबरची उच्चांकी तर राज्यात दहाव्या क्रमांकाची उच्चांकी मतं घेत आमदार म्हणून निवडून आलो गेली ४५ वर्षे केलेल्या कामाची पोचपावती या निमित्ताने मिळाली. यासाठी मिळालेली शिरोळकरांची ताकद कधीही विसरणार नाही. आमदार म्हणून काम करताना या परिसराचा विकास करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनेचा लाभ तळागाळापर्यंतच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करू. सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली. या संधीचे सोनं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असाही विश्वास त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.

 

 

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने बापू यानी सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका पार पाडली आहे.त्यांची जिद्द व चिकाटी वाखण्याजोगी आहे.शिरोळच्या सुपुत्राने हातकणंगले मतदारसंघातून आमदार म्हणून मिळवलेला विजय हा शिरोळकरांना अभिमानास्पद आहे.शिरोळ तालुक्यातील विकास कामांचा पाठपुरावा करण्यासाठी बापूंनी दिलेले पत्र कोणतेही मंत्री नाकारणार नाही याचा मला विश्वास आहे. यामुळे बापूंच्या रुपाने शिरोळ तालुक्याचा विकासाचा रथ आपणास पुढे नेण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे आपल्या प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की, आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम करत असताना सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम केले. गेली ४५ वर्षे ते जनतेची सेवा करीत आहेत. दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, लोकसंपर्क आणि वरिष्ठ नेते मंडळींनी दिलेले पाठबळ, हातकणंगले तालुक्यातील जनतेने दिलेली साथ व शिरोळकरांचे आशीर्वाद यामुळे ते आमदार झाले आहेत. त्यांच्या विजयामुळे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती जनतेने त्यांना दिली आहे. शिरोळच्या भूमिपुत्राने मिळवलेला हा ऐतिहासिक विजय निश्चितच विकासाला चालना देणारा ठरेल. असा आम्हाला विश्वास आहे. असे त्यांनी सांगितले.

 

 

 

या नागरी सत्कार समारंभात प्रसिद्ध व्याख्याते मधुकर पाटील यांचे व्याख्यान झाले. स्वागत जेष्ठ पत्रकार डॉ. दगडू माने यांनी केले. मानपत्राचे वाचन तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने यांनी केले. शिरोळभूषण बजरंग काळे यांनी आभार मानले.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, दरगू गावडे, गजानन संकपाळ, गोरखनाथ माने, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ नीता माने, माजी नगरसेवक डॉ अरविंद माने, पंडित काळे, प्रकाश गावडे, योगेश पुजारी, दयानंद जाधव, श्रीवर्धन माने देशमुख, दादासो कोळी माजी ग्रा. प. सदस्य धनाजी पाटील नरदेकर, विजय आरगे, माजी जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, माजी उपसभापती सचिन शिंदे, बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख, सुभाषसिंग रजपूत, गुरुदत्तचे संचालक शिवाजीराव जाधव, शिरोळ भूषण दिलीपराव माने, व्याख्याते उदय मोरे, रामप्रसाद पाटील, डॉ. अभिजीत माने, सौ सरिता माने, बबन बन्ने, सागर कोळी,अविनाश टारे, सचिन माळी, तुकाराम पाटील, के एम भोसले, संजीव पुजारी, आयुब मेस्त्री, संभाजी भोसले, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर, किरण गावडे, उल्हास पाटील ,संदीप माने, ओंकार माने, आनंदा बन्ने, संतोष माने , दिग्विजय माने, श्रावण खांडेकर किशोर पाटील रेंदाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!