गणपतराव पाटील दादांच्या क्षारपड मुक्तीच्या कामावर विरोधकांचा डोळा का?
विरोधकांना आत्ताच शिरोळ तालुक्याचा इतका कळवळा का आला आहे ?
क्षारपडमुक्तीच्या कामात राजकीय प्रतिष्ठेचा आणि अहंभावाचा तिढा कशासाठी?
दादांच्या नि:स्वार्थपणे क्षारपड मुक्तीसाठी चाललेल्या प्रयत्नांना निश्चितच हत्तीचे बळ मिळणार: जनतेला विश्वास
संजय सुतार / विशेष
शिरोळ विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तथाकथित विरोधकांनी क्षारपड जमिनीचा प्रश्न चर्चेत आणला आहे.पण या विरोधकांना क्षारपड जमीन मुक्तीचा कार्यक्रम या शिरोळ तालुक्यात आणि परिसरात श्री दत्त कारखान्याचे माजी चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण सहकार्यातून 2017 पासूनच सुरु असलेला यांना माहित नाही का? आमदारांच्या कडून ऑक्टोबर 2024 मध्ये क्षारपड मुक्तीच्या कामाचे टेंडर काढून नऊ गावांमध्ये हे काम होणार असल्याचे सांगितले गेले. पण गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदारांनी यासाठी किती प्रयत्न केले? आणि किती एकर जमीन क्षारपडमुक्त केली? असा सवाल विचारला जात आहे.गणपतराव पाटील यांनी 10 हजार एकरावरती क्षारपड मुक्तीचे काम करून शिरोळ तालुक्याला आर्थिक सक्षम बनविण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. आगामी काळात 15 हजार एकर जमीन क्षारपडमुक्त झाली तर दरवर्षी 400 ते 500 कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. शेतकरी आणि शेतकरी कुटुंबासाठी गणपतराव पाटील यांचे काम हे एक प्रकारे वरदान आणि आशीर्वादाचे ठरले आहे. गणपतराव पाटील यांच्या या क्षारपडमुक्तीच्या कामाला विरोध करणाऱ्यांनी आपणच कसे या कामामध्ये पुढाकार घेऊन काम करणार आहोत हा भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या भूलथापांना शेतकरी बळी पडणार नाहीत असेही शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.जिल्हा बँकेच्या आणि आमदारकीच्या माध्यमातून क्षारपड जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचे आमिष दाखविले गेले. 60 लाखांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेऊन त्या निधीतून क्षारपड मुक्त जमिनीचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचा डांगोरा पिटला गेला.
गेल्या पंचवीस- तीस वर्षापासून क्षारपड जमिनी नापीक होऊन तशीच पडलेली या विरोधकांना कशी काय दिसली नाही? क्षारपड जमिनीत काहीच पिकत नसल्याने शेतमालक दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करताना यांना का दिसला नाही? त्या जमिनीत बाभळी, बोराटी, काट्याची झाडे मोठी झालेली यांना कशी काय दिसली नाहीत? आत्ताच या विरोधकांना क्षारपड जमिनी क्षारमुक्त करण्याचा विचार कसा काय आला? 5 वर्षे ही नेतेमंडळी कोठे होती? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. जिल्हा बँकेत सत्तेत असताना आणि आमदार, मंत्री असताना क्षारपड जमिनीचा प्रश्न कधी पडला नाही. नुसताच त्यावर कागदे रंगवायची, त्याचे उत्तर शोधण्याचा, शेतकऱ्यांना मदत करण्याचा विचार कधी आला नाही, मग हा विचार आत्ताच का आला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.गणपतराव पाटील दादांचे क्षारपड मुक्तीचे काम बघून आणि दादांनी स्वबळावर आपल्या समूहातील को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांना कर्जे उपलब्ध करून देऊन, प्रत्यक्ष काम सुरू केले आणि त्याला मोठे यश येत असल्याचे पाहून अधून-मधून काही बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिल्याचा बोभाटा संबंधितांकडून करण्यात आला. पण या प्रयत्नातून किती एकर जमीन क्षारमुक्त झाली हे कधीच बाहेर आलेले नाही. याची कोणालाच माहिती नाही. पण आज अखेर दादांच्या प्रयत्नातून 10 हजार एकर जमीन क्षारमुक्त झाली आहे.15 हजार एकरावर प्लॅन करून प्रत्यक्षात कामही सुरू आहे. शिरोळ तालुका परिसरात 25 हजार एकराचे क्षारपड मुक्त जमिनीचे लक्ष्य घेऊन दादा काम करीत आहेत.असे असताना 60 लाखांचा निधी आणून क्षारपड जमिनीचे कोणते सर्वेक्षण करून धन्यता मानण्यात आले आहे? गावागावात पाणथळ आणि जमीन क्षारपड सुधारणेसाठी शासनाचा निधी मंजूर झाल्याचे बॅनर लावून त्यातून खरेच क्षारपड मुक्तीचे काम झाले का? हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे.आपणही क्षारपड मुक्तीसाठी खूप मोठे काम करण्याचा देखावा करण्याची काहीच गरज नव्हती. ‘माझ्याच कोंबड्याने सूर्य उगवणार’ अशी चुकीची भूमिका घेऊन गावागावातील शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावून, वेगळी चूल मांडायला लावून, क्षारपड जमीन सुधारणा योजना करण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळीच दिशा दाखवून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी अशी राजकीय तोडफोड सुरू आहे का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
दादांच्या दूरदृष्टीने क्षारपडमुक्तीचे काम होत असून शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा एकदा समृद्धी आणण्याच्या या अभूतपूर्व कामाची दखल खुद्द केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर घेऊन 11 कोटी 46 लाखाचे अनुदान क्षारपडमुक्त जमिनी करण्याच्या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मंजूर केले. खर्या अर्थाने दादांच्या या उल्लेखनीय कामाला केंद्र सरकारचे प्रशस्तीपत्रकच मिळाले. आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व तालुक्यातील क्षारपडमुक्तीचा हा विजयी रथ पुढे जात असताना त्याला राजकीय प्रतिष्ठेचा आणि अहंभावाचा तिढा कशासाठी घातला जात आहे? क्षारपड मुक्तीच्या या प्रचंड मोठ्या कामावर या विरोधकांचा डोळा का आहे? यामागचे गौडबंगाल काय? असाही प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
दिलेला शब्द पाळायचा नाही. सर्व सत्ताकेंद्रे, पदे आपणालाच मिळायला हवीत. आमदारपद, मंत्रीपद असताना जिल्हा बँकेचा संचालक होण्याचा संकुचितपणा ठेवायचा अशी एकाधीकारशाहीची भूमिका शिरोळ तालुक्यासाठी मारक ठरणारीच होती. म्हणूनच गणपतराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत लढण्याचे धारिष्ट्य दाखवून आव्हान उभे केले आहे. छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मोठमोठ्याने जनतेसमोर मांडायचा, शेतकऱ्यांच्या विकासाची भाषा करायची आणि त्या विचारांना साम, दाम, दंड, भेद वापरून, अर्थपूर्ण दिशा दाखवून, महापुरुषांच्या विचाराला वाटाण्याच्या अक्षता दाखवायच्या, असले प्रकार जनता कशी काय सहन करेल? असेही बोलले जात आहे. विरोधकांना आत्ताच शिरोळ तालुक्याचा इतका कळवळा का आला आहे आणि गणपतराव पाटील दादांच्या क्षारपड मुक्तीच्या कामावर यांचा का डोळा आहे? असे प्रश्न जनतेतून विचारले जात असून आमदारकीसाठी चाललेली ही राजकीय खेळी जनता उलथवून लावेल असे ठामपणे सांगितले जात आहे.शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जनता सारासार विचार करून गणपतराव पाटील दादांना त्यांच्या कामाची दखल घेऊन निश्चित विजयी करेल असाही आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे. दादांना विजयी करून त्यांच्या नि:स्वार्थपणे क्षारपड मुक्तीसाठी चाललेल्या प्रयत्नांना जनता निश्चितच हत्तीचे बळ देईल, असा विश्वासही शेतकरी व्यक्त करीत आहेत.