शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्राची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भ्रष्ट सरकार, पक्ष फोडणाऱ्या सरकारला घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा निर्णय जनतेने घेतलेला आहे. राजकारणात विचारांना आणि तत्वांना खूप महत्त्व असते. पण ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, असे परस्पर विरोधी लोक एकत्र येऊन सरकार स्थापन करन महाराष्ट्राला अधोगती मध्ये नेण्याचे पाप त्रिकूट महायुतीच्या सरकारने केले आहे. देशाची आणि राज्याची प्रगती करण्यासाठी या महायुतीच्या त्रिकूट सरकारला घालवण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
स्व. सा. रे. पाटील यांनी समाजवादाचा पुरस्कार केला, कोणाला त्रास दिला नाही. अशा साहेबांचा वारसा स्वच्छ, निर्मळ मनाच्या आणि कमी बोलून जास्त काम करणाऱ्या गणपतराव पाटील यांनी चालविला आहे. ज्यांनी मतदारांना विचारात न घेता राजकारण केले, त्यांना त्यांच्या विचारापासून मतदार कसे लांब जातात हे दाखवण्याची वेळ आली असून गणपतराव पाटील यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.