विधानसभेला आंबेडकरवादी पक्ष,संघटना ‘जशास तसे’ उत्तर देणार?

विधानसभेला आंबेडकरवादी पक्ष,संघटना ‘जशास तसे’ उत्तर देणार

‘परिवर्तनाचे वारे, आपण सारे’ या भूमिकेचा लोकांच्या मनावर परिणाम

संजय सुतार / विशेष

गेल्या दीड वर्षापासून चर्चेत नसणारा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा विषय विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपुरातील काही लोकांना घेऊन पुतळा समितीचा पाठिंबा यड्रावकर यांना जाहीर केल्याची बातमी समाज माध्यमावर झळकली.समाज बांधवांची बैठक घेऊन हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.सिटी सर्व्हे नंबर 1251 च्या समोरील बागेत पुतळा बसविणे आणि 1251 मध्ये अभ्यासिका,सेंटर करणार या निर्णयाला सर्वांचा पाठिंबा असल्याचे सांगितले गेले.प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार असून 28 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे येणार असून हा पुतळा स्टँड चौकातील बागेत बसविणार असल्याचे सांगितले जात आहे.यावर लगेचच आंबेडकरवादी पक्ष आणि संघटना मधून तसेच जनतेतून विरोधी प्रतिक्रिया जोरदारपणे उमटल्या आहेत.आंबेडकरवादी पक्ष,संघटना ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीला पाठिंबा देत पुतळ्याचा प्रश्न पुन्हा एकदा लोकांसमोर आणला आहे.सि.स.नंबर 1251 मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.त्यामुळे ‘परिवर्तनाचे वारे, आपण सारे’ या भूमिकेचा लोकांच्या मनावर परिणाम होत असून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रश्नावर सद्यातरी आंबेडकरी जनतेत असंतोष असल्याचे दिसत आहे.दीड वर्षापूर्वी निर्माण झालेली कटुता नाहीशी होत असताना आणि समाज बांधवांची मने जुळत असताना पुन्हा एकदा पुतळा विषयावरून आंबेडकरी,दलित समाजामध्ये दोन गट पाडण्यात संबंधितांना यश आले आहे.विधानसभा निवडणुकीत विजयासाठी श्रेयवादाची लढाई करण्यात धन्यता न मानता समाज दुभंगणार नाही हे पाहणे गरजेचे होते. जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देण्याच्या भाषणात वल्गना करायच्या आणि जाती,समाजामध्येच फूट पाडून पाठिंबा मिळवण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करायचा,यामुळे जातीयवादाचे विष किती पसरवले जात आहे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असेही कार्यकर्त्यामधून बोलले जात आहे.दीड वर्षांपूर्वी सि.स. नंबर 1251 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनाकडून 34 दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.हे आंदोलन,उपोषण मिटविण्यासाठी म्हणून तोडगा काढण्याचा प्रयत्नही झाला.आश्वासन देण्यात आले.दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी आंदोलन स्थगित झाले,पण दुसऱ्याच दिवशी एस.टी.स्टँड हद्दीमध्ये पुतळा उभारणी कामाचा शुभारंभ खुद्द आमदारांनी करून आंदोलनकर्त्यांना चितावणी दिली.एका दिवसातच आश्वासनाला ‘केराची टोपली’ दाखविण्यात आली. यातूनच पुन्हा रोष उत्पन्न झाला आहे.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने गेल्या दीड वर्षात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.त्याचबरोबर एस.टी.स्टँड मधील पुतळ्याचे कामही पूर्णपणे थांबलेले आहे.या दीड वर्षात कोणतीही प्रगती झालेली नाही हे वास्तव आहे.असे असताना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत, आचारसंहितेचा काळ असतानाही पुन्हा एकदा पुतळा समितीच्या नावावर बैठक घेऊन,चर्चा करून,निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. दलित आणि आंबेडकरवादी समाज बांधवांना जाणूनबुजून डिवचण्याचा हा प्रयत्न नक्कीच ‘जिव्हारी’ लावणारा ठरला आहे.पुतळा, अभ्यासिका करायचीच होती तर मग दीड वर्षे तुम्ही गप्प का होतात? निवडणुकीत हा विषय पुन्हा आणून समाजात दुफळी माजवण्याचा कोणता हेतू आहे? ‘फोडा आणि राज्य करा’ ही भाजपाचा झेंडा घेऊन आपण जाणूनबुजून लोकशाही विचाराला धक्का देण्याचा, मनुवादी विचारांना मदत करण्याचा तसेच दलित समाजाच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न का करण्यात येत आहे? असा संतप्त सवाल आंबेडकरवादी जनतेतून विचारला जात आहे.पुतळ्यासाठी आंदोलनकर्ते,सर्वच आंदोलक आणि समाज एकीकडे एकवटलेला असताना आमदारांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा समाजातील आपल्याच बांधवांप्रती संतापाची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गोष्टी होण्यामध्ये आपले श्रेय, सिंहाचा वाटा आहे.या अट्टाहासातून जातीपातीच्या राजकारणाला वेगळा रंग दिला जात आहे.कोणालाही विश्वासात न घेता,विचार विनिमय न करता,न सांगता, परस्परच पुतळा समिती स्थापन करण्यापासून भूलथापा देऊन,आमिषे दाखवून पुन्हा वीस-पंचवीस लोकांच्या माध्यमातून आपल्याला सर्व समाजाचा पाठिंबा कसे आहे हे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न का केला जातो आहे? संभ्रमाचे वातावरण तयार करून समाजामध्ये, समाज बांधवांमध्येच भांडणे का लावली जात आहेत? राजकारणासाठी कटूता निर्माण करणे ठीक आहे का? छत्रपती शिवराय- फुले- शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा मीच कसा पुरस्कर्ता आहे हे दाखवण्यासाठीची ही खटपट मतासाठीच चालली आहे का ? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्मारकाचे काम अपूर्ण असताना महाराजांचा पुतळा बसविण्याचा जसा प्रयत्न झाला तसा प्रयत्न डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भातही होणार नाही हे आपण सांगू शकता का? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आता झाकून ठेवण्यात आला असून लोकार्पण सोहळा झाला म्हणजे नेमके काय केले? डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भातही अशीच मनमानी का केली जात आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी मराठा, बहुजन समाजातील जनतेने 20 वर्षांपासून दिलेला लढा विचारात न घेता आपणच महाराजांचा पुतळा बसविला असे सांगून ‘श्रेय’ जसा घेण्याचा प्रयत्न झाला तसाच प्रयत्न डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भातही घेतला जातो आहे का? असे अनेक प्रश्न समाज बांधव विचारीत आहेत.महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना बहुतांश आंदोलनकर्ते, आंबेडकरवादी पक्ष,संघटना पाठिंबा देऊन प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय झाले आहेत.उघड उघड प्रचारात आपली भूमिका ते सांगत आहेत. यातच माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कुरुंदवाडच्या सभेत डॉ.आंबेडकरांचा पुतळा सि.स.नंबर 1251 मध्येच बसविणार असल्याचे ठोस आश्वासन दिल्याने आंबेडकरी समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.त्यामुळे राजकीय स्वार्थापोटी भारतीय संविधानाची पायमल्ली करणाऱ्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ,अशी आव्हानात्मक भाषणे दिली जात आहेत.एक ठोस भूमिका घेऊन आंबेडकरी समाज सध्या काम करतो आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार असून 28 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे येणार असून हा पुतळा स्टँड चौकातील बागेत मीच बसविणार असल्याचे विद्यमान आमदारांनी सांगितल्याने या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.या संदर्भामध्ये 34 दिवस ज्यांनी आंदोलन केले आणि आणि सिटी सर्व्हे नंबर 1251 मध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा ही मागणी ज्यांनी लावून धरली आहे, असे आंबेडकरवादी विचाराचे नेते रमेश शिंदे यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘पुतळा बसेल तो फक्त सिटी सर्व्हे नंबर 1251 क्षेत्रामध्येच बसेल.सर्व समाजाची मागणीच 1251 ची आहे.यासाठीच आंदोलन,मोर्चे काढले आहेत. त्यासाठीचा लाठीहल्ला लोक विसरलेले नाहीत.जो पुतळा बसेल तो फक्त 1251 मध्येच बसेल.कोणीही बुडबुड करू नये. सिटी सर्व्हे नंबर 1251 मध्येच पुतळा बसविण्याची संपूर्ण बौद्ध,आंबेडकरवादी समाजाची मागणी आहे.जे कोणी आंडूपांडू आहेत,सटरफटर आहेत त्यांना समाज धुडकावून लावेल.त्या ठिकाणीच आम्ही आग्रही आहोत.तिथेच आम्ही पुतळा बसविणार आहोत.’
रमेश शिंदे यांनी आमदारांच्या या कृतीला विरोध दर्शविल्याने या गोष्टीचा चांगला वाईट परिणाम निवडणुकीवर 100 टक्के होणार आहे. निवडणुकीनंतरही हा वाद उफाळून येऊ शकतो.
हा वाद सुरू असतानाच जे आंबेडकरवादी पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी,कार्यकर्ते हे गणपतराव पाटील यांना पाठिंबा देऊन प्रचार करीत आहेत,त्यांची वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जात असून, त्यांचे पद काढून घेऊन, दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला जात आहे.यामुळे आणखी चिड वाढली असल्याचेही दिसून येत आहे.पण या कार्यवाहीला हे पदाधिकारी दाद न देता गणपतराव पाटील यांना खुलेआम पाठिंबा देऊन प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय झाले आहेत.ज्या पक्षाचे, संघटनेचे दोन तीन दशके काम करूनही जर कार्यवाही होत असेल तर त्या वरिष्ठांना कोणता डोस? दिला असेल? अशा चर्चाही होत आहेत.विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळी मध्ये आंबेडकरी समाज आणि पक्ष, संघटना कडून पदाधिकारी या विषयावर प्रत्येक गावात रान उठवीत असून समाज बांधवांना आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत.आम.यड्राकर यांच्या पराभवासाठी हे पदाधिकारी ‘प्रयत्नांची पराकाष्टा’ करीत असल्याने या निवडणुकीचे वारे निश्चितपणे फिरणार असून ‘परिवर्तनाचे वारे, आपण सारे’ ही भूमिका लोकांच्या मनावर परिणाम करताना दिसून येत आहे.

Spread the love
error: Content is protected !!