शिरोळ / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुक व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ विधानसभा मतदारसंघातील शिरोळ,नांदणी, टाकवडे,शिरटी, नृसिंहवाडी येथे सशस्त्र सीमाबल (एसएसबी) व शिरोळ पोलिसांनी संचलन केले. विधानसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची प्रशासन तसेच पोलीस यंत्रणाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.२२ ऑक्टोबर पासून निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे शहर व गाव पातळीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये,यासाठी पोलिस यंत्रणेकडून आधीच खबरदारी घेतली जात आहे.याचाच एक भाग म्हणून शिरोळ पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ,नांदणी,टाकवडे,शिरटी व नृसिंहवाडी येथे सशस्त्र सीमाबल व शिरोळ पोलीस ठाणे यांच्यावतीने आज रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिरोळ तहसील कार्यालय ते जय भवानी चौक,छत्रपती संभाजी महाराज चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,भाजी मंडई, एसटी स्टँड चौक तसेच नांदणी,टाकवडे,शिरटी व नृसिंहवाडी येथील प्रमूख मार्गावरुन संयुक्त संचलन झाले. विधानसभा निवडणुकीसाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये,ही निवडणूक शांततेत पार पाडावी,यासाठी आता पोलिसांची सर्वत्र करडी नजर असणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.