शिरोळ पंचायत समितीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
वाचन संस्कृती जोपासल्यामुळे माणसाच्या जगण्याला प्रगल्भता प्राप्त होते व व्यक्तिमत्त्व संपन्न बनते असे प्रतिपादन ॲड.प्रा. श्रीकांत माळकर यांनी केले.
पंचायत समिती शिरोळ यांचेवतीने डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी नारायण घोलप हे होते. गटशिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी, कक्ष अधिकारी प्रशांत डोईफोडे, श्री लोहार प्रमुख उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना ॲड. माळकर पुढे म्हणाले,” मोबाईल व सोशल मीडियाच्या विळख्यात हरवलेल्या आजच्या धावपळीच्या जगात वाचन संस्कृती लोप पावत असून तिला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणे ही शिक्षक , पालक व विद्यार्थी यांची सामूहिक जबाबदारी आहे. वाचनाचे महत्व अनन्यसाधारण असून वाचनामुळे इतिहासाचे ज्ञान होते , वर्तमानाचे भान येते व भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी प्राप्त होते.यासाठी प्रत्येकाने एक तरी चांगले पुस्तक वाचून आपले जीवन आनंदी व समृद्ध करावे ”
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पंचायत समिती शिरोळचे अधिकारी उदय भोसले यांनी केले. गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.यावेळी सर्व विभागांचे खाते प्रमुख व कर्मचारी वर्ग , मेजर प्रा. के एम.भोसले , मुख्याध्यापक शरद सुतार , पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.