कुंभोज परिसरात विद्यार्थी व प्रवासी वाहतुकीसाठी एकच एसटी
कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
23 हजार लोकसंख्या असणाऱ्या कुंभोज गावांमध्ये सध्या एसटी एक व समस्या अनेक अशी अवस्था निर्माण झाली असून ,याकडे एसटी महामंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे.परिणामी एसटीतून प्रवास करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असून यामुळे अनेक ठिकाणी वादविवाद निर्माण होत आहेत.लोकसंख्येने मोठे असणाऱ्या कुंभोज गावात दिवसभरातून काही बोटावर मोजण्या इतक्याच एसटी बसेस हातकलंगले,इचलकरंजी वाहतूक करतात परिणामी सदर एसटीतून वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची व विद्यार्थ्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र सध्या दिसत असून,याबाबत एसटी महामंडळाला वारंवार विनवण्या करूनही एसटी महामंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.परिणामी त्यामुळे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत असून,विद्यार्थिनी एसटी सेवेसाठी काढलेल्या पासमुळे विद्यार्थ्यांना एसटीतून प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही.परंतु याच विद्यार्थ्यांना एसटीत जागा न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एसटीमध्ये उभे राहून अथवा जागा मिळेल तिथे खाली बसून आपला प्रवास करावा लागत आहे.याबाबत एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुंभोज परिसरातील अनेक संघटनांच्या वतीने तसेच विद्यार्थी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.कुंभोसह परिसरातून जवळजवळ ८०० ते १००० विद्यार्थी इचलकरंजी,कोल्हापूर,पेठ वडगाव,बाहुबली या परिसरात कॉलेज व शालेय शिक्षणासाठी प्रवास करत असतात परिणामी या विद्यार्थ्यांच्यासाठी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच बसेस दिवसभरात उपलब्ध आहेत.दरम्यान बसेस मध्ये 50 पेक्षा जास्त विद्यार्थी अथवा प्रवासी बसू शकत नाहीत परंतु पर्याय नसल्यामुळे सदर एसटी बसेस मध्ये सध्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थी भरल्याने विद्यार्थीना त्रासांला सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळ कायद्याचे उल्लंघन करून सदैव विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक एसटीतून केली जाते.परिणामी एसटीचे काही अधिकारी एक दिवस आड सदर एसटी चेकिंगसाठी येतात परंतु ते एसटीतील प्रवाशांचे तिकीट चेक करतात,पास चेक करतात पण त्या एसटीत असणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र मोजत नाहीत, याबाबत ते मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल ही सर्वसामान्य पालकातून उपस्थित राहत असून अशाच पद्धतीची वाहतूक व्यवस्था राहण्यापेक्षा शासनाने खाजगी वडाप धरकांना शासकीय परमिशन द्यावी व सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सोय करून द्यावी असे तीव्र उद्गार कुंभोज परिसरातील विद्यार्थी व पालक वर्गातून व्यक्त होत आहेत.