श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथं भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं यंदाच्या मोसमातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा भाविकांच्या उपस्थितीत ‘श्री गुरुदेव दत्त’ च्या जयघोषात आज संपन्न झाला.आज श्रावण सोमवार आणि गोकुळ अष्टमीचा देखील दुर्मिळ योगायोग असून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान करून दक्षिण द्वार सोहळ्याचा लाभ घेतला.गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळं कृष्णा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झालीय.कृष्णा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा वाढल्यानं श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात तिसऱ्यांदा कृष्णेचे पाणी शिरले.त्यामुळं आज सोमवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास या मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालाय.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे. कृष्णामाईचे पाणी उत्तर द्वारातून प्रवेश करून श्रीं च्या चरण कमळाला स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडते. त्यास चढता दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. या पाण्यामध्ये भाविक स्नान करतात. यामुळे सर्व रोग, पाप मुक्त होऊन पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. आज हिंदू पंचांगातील पवित्र मानला जाणारा श्रावण महिन्यातील सोमवार आणि गोकुळ अष्टमी हा दुर्मिळ योगायोग साधून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान केले. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दत्त देव संस्थांन कडून उत्तम प्रकारे सोय केली. दरम्यान, भाविकांच्या दर्शनासाठी श्रीं ची उत्सवमूर्ती नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे.