शिरोळ स्टेट बँक शाखेस ४० लाखांची फसवणूक
म्हैसाळ येथील ठकसेन संशयित अशोक कोरवी पोलिसांच्या ताब्यात ;
कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यात आर्थिक फसवणूक केल्याची चर्चा
शिरोळ / प्रतिनिधी
सांगली जिल्हयातील म्हैशाळ ( ता मिरज ) येथील एका ठकसेनाने स्वतःची मिळकत आहे असे भासवून शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन चाळीस ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत स्टेट बँक शिरोळ शाखेचे शाखा अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे.दरम्यान,संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,म्हैशाळ येथील संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याने सिटी सर्व्हे नंबर २७३ मिळकत ही स्वतःची आहे असे बँकेला भासवले होते.त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन ३९ लाख रुपयांचे कर्ज घेतले .सदर कर्जाची रक्कम २५ जुलै २०१९ रोजी बँकेच्या खात्यामधून उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आजअखेर कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही.यामुळे सदरचे कर्ज थकीत झाले असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरोळ स्टेट बँके शाखेने संबंधित कर्जदाराची पडताळणी केली असता संशयित आरोपी कोरवी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बुधवारी शिरोळ पोलिसात रात्री उशिरा ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात संशयित आरोपी कोरवी यांनी व्यक्तिगत तसेच सहकारी संस्थांना फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे.पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुल्ला अधिक तपास करीत आहेत.