महापुरातून होणार सुटका,पुराचे पाणी दुष्काळी भागात, ४ हजार कोटींचा निधी मंजूर
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्याच्या राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रकल्पास जागतिक बँकेने पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे.मुंबईत ‘मित्रा’च्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती ‘मित्रा’चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.’जिल्ह्याला चारवेळा महापुराचा मोठा फटका बसला.पातळी प्रत्येकवेळी वाढत गेली,कोल्हापूर,इचलकरंजी शहरांसह करवीर, हातकणंगले,शिरोळ तालुक्यांतील अनेक गावांना विळखा पडतो.महापूर नियंत्रणाबाबत महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत आराखडा जलसंपदा विभागामार्फत करण्यात आला आहे.त्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराचे नियंत्रण,पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणे,असे दोन टप्पे आहेत.पहिल्या टप्प्याच्या चार हजार कोटींच्या निधीस जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. यात पूर नियंत्रणाची कामे, उड्डाणपूल, उपाययोजना, वीजवाहक तारा स्थलांतरण, पुराची पूर्वकल्पना देणारी यंत्रणा,आपत्ती व्यवस्थापन उपकरणे, पूरसंरक्षक उपाययोजना आदी कामे होतील.