नागांव ग्रामपंचायतीने हालोंडी गावच्या हद्दीतून पंचगंगेचे पाणी पिण्यासाठी आणू नये तर मौजे वडगाव पाझर तलाव व शिये हद्दीतून पंचगंगेचे आणावे, हालोंडी येथून पाणी आणून गावच्या जनतेच्या आरोग्याशी खेळू नका असे निवेदन विकास आघाडीच्या वतीने सरपंच , उपसरपंच याना देण्यात आले
पुलाची शिरोली / प्रतिनिधी
नागांव ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने हालोंडी गावच्या हद्दीतून पंचगंगेचे पाणी पिण्यासाठी आणू नये तर मौजे वडगाव पाझर तलाव व शिये हद्दीतून पंचगंगेचे आणावे. हालोंडी येथून पाणी आणून गावच्या जनतेच्या आरोग्याशी खेळू नका असे निवेदन विकास आघाडीच्या वतीने सरपंच , उपसरपंच याना देण्यात आले यावेळी सत्ताधारी व विरोधी विकास आघाडी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली गावच्या पाणी प्रश्नाच्या हितासाठी गावातून एक राजकारण विरहित सर्वपक्षीय समिती निर्माण करावी .
सध्या नागाव ( ता हातकणंगले ) मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचा सुरवातीच्या आराखड्यानुसार मौजे वडगांव पाझर तलाव येथून ही योजना राबविण्यात येणार होती पण मौजे वडगाव ग्रामस्थांनी या तलावातून पाणी योजना करण्यास तीव्र विरोध केल्यामूळे ग्रामपंचायत सत्ताधार्यानी पाणी योजना पाझर तलाव ऐवजी हालोंडी जवळून पंचगंगा नदीतुन पाणी उपसा करण्याचे ठरविले आहे.हालोंडी हद्दीतुन येणारे दूषित पाणीपुरवठा केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतील.
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील व कोल्हापूर शहर आणि गांधीनगर मधून येणारे दूषित पाणी हे नदीत मिसळत असते.त्यामुळे कोल्हापूर ते नरसिंहवाडी पर्यंतच्या नदी काठावरील गावे पंचगंगेचे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत तर ती गावे आपल्या पुढील भविष्याचा व पुढील पिढीच्या आरोग्याचा विचार करत अन्य ठिकाणांहून पिण्यासाठी पाण्याची स्किम राबण्याचा प्रयत्न करत आहेत .
विकास आघाडीने दिलेल्या निवेदनात हालोंडी गावातून पाणी उपसा करण्या पूर्वी दिलेल्या मुद्द्यांवर विचार करावा यामध्ये 1) भारतातील सर्वाधिक प्रदूषित नद्या मध्ये पंचगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे.
2)कोल्हापूर पासून नरसिंहवाडी संगमापर्यत पंचगंगा प्रवाह काठचे कोणतेही गाव पंचगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरत नाही
3) इचलकरंजी सारखी आर्थिक समृद्ध नगरपालिका पंचगंगा पाणीपुरवठा योजना राबविण्याला विरोध करीत आहे 4) पंचगंगेतून दूषित पाण्याचा उपसा करून गावाला पुरवठा केल्यास स्वच्छ आणि मुबलक पाणी या जल जीवन मिशन च्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला जाईल.
5) कोल्हापूर महानगर पालिकेने 400 कोटी ची योजना 1500 कोटींवर गेली तरी थेट नळपाणी योजना काळमवाडी येथून स्वछ पाणी उपसा करून राबवली.
महापालिकेने 1000 कोटी रुपयांचा फिल्टर हाऊस कोल्हापूर मध्ये उभारून पंचगंगेचे पाणी कोल्हापुरातून उपसा करून त्याचे शुद्धीकरण केले असता किमान अंदाजे 500कोटी चे बजेट वाचवु शकले असते पण असे केले नाही कारण फिल्टर हाऊस मध्ये पाणी फिल्टर करण्याच्या प्रणाली नुसार पाण्यातील गाळ निर्गमित केला जातो आणि पाण्यातील सुक्ष्म विषाणू निर्गत केले जातात. या शुद्धीकरण प्रणाली मध्ये पाण्यातील घातक रासायनिक घटक निर्मुलन करता येत नाहीत या कारणांमुळे थेट नळपाणी योजना काळमवाडी येथून राबवण्यात आली. या बाबींचा गांभीर्याने विचार केल्यास आपल्या गावाला हालोंडी गावातून पाणी पुरवठा करणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्या सारखे ठरेल. यावर पर्याय म्हणून दुधगंगा नदीतून कागल, गोकुळ शरगाव, शिरोली औद्योगिक वसाहतीसाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून नागाव गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करणे , या पूर्वी हा पाठपुरावा करण्यात आला होता पण पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील क्रॉसिंगचा अडथळा निर्माण झाल्यामूळे तो प्रयत्न थांबवण्यात आला होता, सध्या हायवेच्या सहपदरी कारणाचे काम प्रगतीपथावर असलेने महामार्ग क्रॉसिंग चा प्रश्न निकाली लागू शकतो
2) पाझर तलावाची निर्मिती ही दुष्काळी परस्थिती चा सामना करण्यासाठी केला होता पाझर तलावाचे ठिकाण हे भौगोलिक परिस्थिती नुसार वडगाव गावच्या हद्दीत निश्चित करण्यात आले होते त्यामुळे तालावावर कोणत्या एका गावची मक्तेदारी असू शकत नाही. मौजे वडगाव ग्रामस्थांशी नियोजन पूर्वक सर्वसामावेशक चर्चा करून पाझर तलावातून पाणी घेणे , 3) अत्यंत महत्वाचे आपल्या गावचे गाव तळे हे पिण्याच्या पाण्यासाठी होते आणि आज ते सुस्थितीत असते तर इतर गावांकडे पाणी मागणेची आपल्यावर वेळ आली नसती आपले गाव तळे हे ऐतिहासिक शिवकालीन तळे असून त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे . आज रोजी तलाव पुनर्जीवित करणेसाठी त्याचे संवर्धन करणेसाठी शासणांकडून भरपूर निधी दिला जात आहे याचा ही सारासार विचार करून निर्णय घेणेत यावा
4) यदाकदाचित पंचगंगेतुन पाणी उपसा करण्याची वेळ आलीच तर शिये हद्दीतून पंचगंगेचे पाणी उपसा करावे जेणेकरून शिरोली औद्योगिक वसाहतीमधील व कोल्हापूर आणि गांधीनगर मधून थेट नदीत मिसळणारे दूषित पाणी टाळता येईल. या पर्यायांचा विचार करण्यासाठी गावातून एक राजकारण विरहित सर्वपक्षीय समिती निर्माण करावी आणि त्या माध्यमातून योग्य पाठपुरावा करावा जेणेकरून लवकरात लवकर गावाला स्वछ आणि मुबलक पाणी पुरतठा करता येईल .
यावेळी सरपंच विमल शिंदे , उपसरपंच सुधीर पाटील, उमाशंकर कोळी, अभिनंदन सोळांकुरे, राष्ट्रीय पेयजलचे अध्यक्ष किरण मिठारी , माजी सरपंच अरूण माळी , प्रकाश पोवार , संतोष पाथरे , सागर गुडाळे , तात्यासो चव्हाण , सचिन माळी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .