कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड शहर व परिसरात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणासाठी कुरुंदवाड शहरात 51शिक्षक आणि 3 सुपरवायझर अशा 54 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.5200 ते 5400 कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे.सर्व प्रगणकांना पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले आहे.दरम्यान 31 जानेवारी अखेर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आदेश असल्याने सर्वच शिक्षक आणि सुपरवायझर यांनी भैरववाडी येथून सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. 180 प्रश्नांचे उत्तर घेण्यासाठी शिक्षकांना मोबाईल ॲप देण्यात आले आहे. ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षणाच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे.कुरुंदवाडचे उपनगर भैरववाडी येथून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.प्रगणकांनी विचारलेल्या 180 प्रश्नांमध्ये कुटूंबाची माहिती, त्यांच्या व्यवसाय, शेती, नोकरी आदी माहिती संकलित करण्यात आली आहे.प्रति कुटुंबाची माहिती संकलन करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ लागत आहे. कुरुंदवाड शहरामध्ये 5200 कुटुंबे आहेत.150 ते 200कुटुंबे विभक्त झाल्याने अंदाजे 5400 कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे.मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण वगळता इतर समाजाची अँपवर प्रारंभी 5 प्रश्नांचे उत्तर संकलित केल्यानंतर आरक्षणाची पुढील माहिती उपलब्ध असल्याचे दर्शवत सर्वेक्षण पूर्ण होत आहे.मराठा आणि खुल्या प्रवर्गातील 180 प्रश्नांचे उत्तर परिपूर्ण भरावे लागत होते. सर्वेक्षणाचा पहिलाच दिवस असल्याने प्रगणकांना माहिती संकलित करत असताना व नागरिकांना माहिती देत असताना अडचणी निर्माण होताना दिसत होत्या.त्यामुळे विलंब होत होता.कुरुंदवाड पालिका क्षेत्रातील सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान यांनी केले आहे.