कुरुंदवाड / प्रतिनिधी
लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे यांनी पिडीत, वंचित आणि श्रमिक, सोशितांच्यासाठी आयुष्यभर काम केले. शेकापच्या माध्यमातून डाव्या विचारातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी नेहमीच संघर्ष केला. त्यांनी दिलेले योगदान हे आजच्या पिढीला लोकनेते भाई आण्णासाहेब डांगे नगर समिती प्रवेशद्वार हे प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कुरुंदवाड भैरववाडी येथील लोकनेते भाई आण्णासाहेब डांगे नगरच्या प्रवेशद्वार उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.आम.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर,खास. धैर्यशिल माने,गुरुदत्त साखरचे माधवराव घाटगे,राहुल आवाडे,माजी मंत्री आण्णासाहेब डांगे,जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम,माजी आम.उल्हास पाटील,माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील,मुख्याधिकारी आशिष चौहान आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आम डॉ.पाटील- यड्रावकर म्हणाले डाव्या आघाडीच्या माध्यमातून गोरगरीब यंत्रमाग शेतमजूर आणि साखर कारखान्याच्या कामगारांच्या पाठीशी नेहमी उभे राहून त्यांना सक्षम करण्यासाठीची चळवळ आण्णासाहेब डांगे यांनी उभी केली होती. अंतिम श्वासापर्यंत त्यांनी डाव्या विचारसरणीला सोडून कोणतेही भांडवलशाहीला मदत होईल असे कार्य केले नाही म्हणून त्यांना गोरगरीब कष्टकऱ्यांनी भाई ही पदवी दिली होती.
यावेळी बोलताना गुरुदत्तचे घाटगे म्हणाले भाई अण्णासाहेब डांगे यांच्यापासून डांगे कुटुंबीयांची राजकारणाची सुरुवात झाली. त्यांच्या पूर्वी कोणतीही राजकीय परंपरा घरात नसताना कुटुंबातील सर्वच बंधूंनी कुरुंदवाड पालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष सह सर्व पदे भूषवली आहेत. कुटुंबातील सर्वांना पदे मिळणे म्हणजे आण्णासाहेब डांगे यांच्या चळवळीची आणि त्यांच्या कर्तृत्वाची नागरिकांनी केलेली उतराई आहे.
यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केले,कदम,आवाडे,जि.प सदस्य विजय भोजे, राजवर्धन नाईक निंबाळकर,अशोकराव माने,इकबाल बैरागदार आदींनी भाषणे केली. मंत्री मुश्रीफ आमदा पाटील यड्रावकर खास माने यांच्या हस्ते प्रवेशद्वारकामानीची फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जि.प सदस्य दादासाहेब सांगावे,शिवसेनेचे बाबासाहेब सावगावे,माजी नगरसेवक जवाहर पाटील,अक्षय आलासे,एन डी पाटील, रमेश भुजुगडे, रामचंद्र मोहिते, बबलू पवार, सचिन जोग, शिवाजीराव सांगले,अजित देसाई आदी उपस्थित होते.आभार माजी नगरसेवक रणजित डांगे यांनी मानले.