कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण विभागातील चतुर्थ श्रेणी मधील अनुकंपा वारसदार यांनी २३ जानेवारी २०२४ अखेर नोकरीची नियुक्तीपत्र न मिळाल्यास महानगरपालिकेच्या दारात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
महानगरपालिकेकडे शिक्षण विभागातील चतुर्थ श्रेणी पदे सन २००८ पासून भरलेली नाहीत. तात्कालीन आयुक्त बिदरी मॅडम यांनी या विभागातील चतुर्थ श्रेणी पदे जसजशी सेवानिवृत्त होतील तसतशी व्यपगत करण्याचा ठराव केला आहे.
पण नोकरीवर ती रुजू असताना मयत झालेल्या वारसा बाबत काहीही ठराव झाले नसताना ही त्यांना आज अखेर नोकरीवर सामावून घेण्यात महानगरपालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे.याबाबत संबंधित वारसदारांनी २१ डिसेंबर २०२१ रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
संबंधित अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्यापही यावर काहीही कारवाई झाली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही याबाबत लक्ष घालून आमच्या नोकरीचा प्रश्न सोडवावा म्हणून या वारसदारांनी साकडे घातले होते.
पण त्यांच्याकडून व महानगरपालिकेकडून अद्यापही यावर काहीही कारवाई केलेली नसल्याने, अखेर या वारसदारांनी आयुक्तांना भेटून २३ जानेवारी २०२४अखेर नोकरीचे नियुक्तीपत्र न दिलेस आपण २४ जानेवारी
२०२४ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले आहे.यावर स्नेहल खडके,अश्विनी बिरांजे, विकास जाधव,गौरव रावराणे,अवधूत पाटील,धनंजय यादव, शुभम मिठारी आदींच्या सह्या आहेत.