काळ्या आईला क्षारपडापासून मुक्त करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक
श्री दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली ग्वाही
शिरोळ / प्रतिनिधी
जमीन क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य मिळत आहे.सच्छिद्र निचरा प्रणाली हे तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतातून अतिरिक्त पाणी बाहेर काढल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते हे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. आपली जमीन बलदंड असेल तर कुटुंब सुद्धा बलदंड होते. त्यामुळे जमीन
सुधारून नव्या पिढीला शाश्वत शेतीचे महत्व पटवून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.त्यामुळे आपले जीवन जगवणाऱ्या काळ्या आईला क्षारपडापासून मुक्त करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असून श्री दत्त उद्योग समूह शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,अशी ग्वाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
कवठेएकंद (जिल्हा सांगली) येथे सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नंबर एक व दोनच्या कार्यक्षेत्रातील 3000 एकरावर क्षारपड, पाणथळ व संभाव्य क्षारपड क्षेत्राचा सर्व्हे कामाचा शुभारंभ वसगडे वाट रस्ता (सिंग डेअरी) येथे करण्यात आला.
यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.खासदार संजय काका पाटील यांनीही यावेळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.गणपतराव पाटील यांनी आपल्या भाषणात सुपर केन नर्सरी, फौंडेशन बियाणे, 200 टन ऊस उत्पादन, सेंद्रिय कर्ब वाढ, माती परीक्षण,बँक मदत तसेच प्रकल्पाची तांत्रिक माहिती व मार्गदर्शन यावर सखोल विवेचन केले.
कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद (भाऊ) लाड म्हणाले, काळाचा वेध घेउन शेतकऱ्यांनी शेती करण्याची भूमिका घेतली पाहिजे.जमिनीची सुपीकता कमी झाल्याने आणि उत्पन्न येत नसल्याने तरुण पिढी शेतीपासून दूर जात आहे.यासाठी शेतीचे आरोग्य वाढविणे गरजेचे आहे.भविष्यातील संकट
ओळखून सिध्दराज संस्थेने योग्य वेळी क्षारपड मुक्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी क्रांती कारखाना सहकार्य करेल.युवा नेते रोहित पाटील म्हणाले,अतिरिक्त पाणी, रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन क्षारपड, पाणथळ होण्याची समस्या वाढत गेली.याकडे दुर्लक्ष झाल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादन घटले आहे.
अशावेळी शेतीतील नव्या आव्हानांना सामोरे जात नवनवे प्रयोग करणे आवश्यक आहे.सिध्दराज संस्था आणि गणपतराव पाटील यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून क्षारपड मुक्तीचे अभिनंदनीय काम करीत आहेत.शेतकऱ्यांना शाश्वत शेती आणि सुरक्षित पैसा या योजनेतून मिळणार आहे.
प्रा.बाबुराव लगारे यांनी शेतकऱ्यांचा सहभाग, योजना कशी राबवावी, येणारा खर्च,संस्था स्थापन करणे आधी सविस्तर गोष्टी सांगून सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वयंप्रेरणेने योजनेत सहभागी होऊन गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने क्षारपड मुक्तीचे काम पूर्णत्वास नेणार असल्याचे सांगितले.
भूपाल मगदूम यांनी भिलवडी येथील क्षारपड मुक्तीच्या कामाची यशोगाथा सांगितली. सुखदेव कदम यांनी या योजनेत भाग घेऊन शेतकऱ्यांनी आपली शेती वाचवावी असे आवाहन केले. दत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी सच्छिद्र निचरा प्रणाली प्रकल्पाबाबत माहिती दिली.
प्रारंभी सिध्दराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व सर्व्हे कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत डॉ. नरेंद्र खाडे यांनी तर प्रास्ताविक रामचंद्र थोरात यांनी केले. विद्यासागर लंगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार महादेव देशमाने यांनी मानले. संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अमृत सागर, कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, नागसेन कांबळे, अशोक घाईल, सर्जेराव पाटील,सिराज मुजावर, प्रवीण वठारे, सुधीर खाडे, दीपक घोरपडे,विजयराव पाटील,उमेश माळी, बाळासो शिरोटे, सुरेंद्र शेंडगे,रामराव पाटील,
अविनाश माळी, राजाराम माळी, सूर्यकांत पाटील,संजय थोरात, प्रकाश देसाई, सतीश खोंद्रे, श्री जाधव, संजय सुतार यांच्यासह पाणीपुरवठा संस्थेचे सर्व सदस्य, शेतकरी उपस्थित होते.