डंपरच्या धडकेत भुये येथील तरूण ठार
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिये फाटा ते निगवे राज्य मार्गावर, क्रशर लाईन येथील पेट्रोल पंपाशेजारी भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत भुये येथील तरुण दुचाकीस्वार जागीच ठार झाला . हा अपघात मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात मयत तरूणाचे नाव राहुल रामचंद्र शिंदे (वय ३६, रा. भुये, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीत कामाला होता. मंगळवार हा कामावरचा व आठवड्याचा पहिला दिवस असल्याने तो सकाळी आपल्या मोटारसायकलवरून (क्र. MH-09-BW-2053) ने शिरोली एमआयडीसीकडे निघाला असता पाठीमागून डबर भरून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा डंपरने (क्र. KL-24-F-6352) ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की राहुलच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर धडकेनंतर दुचाकी डंपरच्या पुढील भागात अडकून सुमारे १५ ते २० फूट फरफटत गेली.
राहुल हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता पुरुष होता. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून, त्याच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुली मोठी मुलगी पहिलीमध्ये तर लहान मुलगी अंगणवाडीत शिकत आहे तो खासगी कंपनीत नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. राहुलच्या आकस्मिक निधनाने भुये गावावर शोककळा पसरली आहे.