स्मॅक भवन येथील कचरा डेपोला आग , स्मॅक प्रशासन व महावितरणच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Spread the love

स्मॅक भवन येथील कचरा डेपोला आग , स्मॅक प्रशासन व महावितरणच्या सतर्कतेमुळे मोठी हाणी टळली

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक भवन परिसरात पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने टाकण्यात आलेल्या कचऱ्याला आज अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र, स्मॅक प्रशासन, व महावितरणची सतर्कता आणि अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे लगतचे वीज केंद्र आणि कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचले असून मोठा अनर्थ टळला.

पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतीच्या हद्दीतील स्मॅक भवन परिसरात शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील ग्रामपंचायतीमार्फत घनकचरा टाकला जातो. आज या कचऱ्याला अचानक आग लागली. कचऱ्यात दीपावलीतील शिल्लक राहिलेले फटाके कोणीतरी टाकल्याने ते मोठ्याने फुटू लागले आणि वाऱ्याच्या वेगामुळे आग वेगाने भडकली. धूर आणि ज्वाळा दूरवरून दिसू लागल्याने औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

घटनेच्या ठिकाणापासून जवळच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) वीज केंद्र आणि विविध कारखाने कार्यरत आहेत. आग अधिक तीव्र होऊन वीज केंद्रापर्यंत किंवा जवळच्या कारखान्यांपर्यंत पोहोचली असती, तर वीजपुरवठा खंडित होण्यासह मोठी वित्तहानी व धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

आगीचे गांभीर्य ओळखून स्मॅक प्रशासन आणि महावितरणच्या यंत्रणेने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला.अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. वेळेवर मिळालेल्या प्रतिसादामुळे आग वीज केंद्र व कारखान्यांपर्यंत पसरण्यापूर्वीच रोखली गेली.

घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तसेच शिरोली सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी व माहिती घेतली. दरम्यान, या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीच्या लगतच्या भागातील कचरा टाकण्याच्या ठिकाणांचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संवेदनशील वीज केंद्र आणि कारखान्यांच्या परिसरात कचऱ्याला आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!