सामाजिक उपक्रमांतून गणेशोत्सवाचा आदर्श; करवीर उपविभागात बोळोलीच्या न्यू चॅलेंज ग्रुप प्रथम

Spread the love

सामाजिक उपक्रमांतून गणेशोत्सवाचा आदर्श; करवीर उपविभागात बोळोलीच्या न्यू चॅलेंज ग्रुपचा प्रथम क्रमांक

कागलच्या डॅश ग्रुपला द्वितीय, भुयेच्या यशवंत गणेश मंडळाला तृतीय क्रमांक; बोरवडेच्या शिवशंभो तरुण मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक

पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे 

गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आरोग्य आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा करवीर उपविभाग स्तरावर गौरव करण्यात आला.

यामध्ये कागल तालुक्यातील बोळोली येथील न्यू चॅलेंज ग्रुप गणेश मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावून मानाचा बहुमान मिळविला. कागल येथील डॅश ग्रुपने द्वितीय, तर करवीर तालुक्यातील भुये येथील यशवंत गणेश मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. मुरगूड विभागातील बोरवडे येथील शिवशंभो तरुण मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

बोळोली येथील न्यू चॅलेंज ग्रुपने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, डिजिटल फलकांच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती आणि सीसीटीव्ही सुरक्षेची व्यवस्था असे विविध उपक्रम राबविले.

विशेष म्हणजे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करत पारंपरिक हलगीच्या गजरात गणेशमूर्तीचे आगमन व विसर्जन करण्याची परंपरा जपली. भव्य गणेशमूर्ती असतानाही विसर्जनाच्या वेळी श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा आदर्श मंडळाने घालून दिला. या मंडळाचे अध्यक्ष सागर आकाराम भित्तम आहेत.

कागल येथील डॅश ग्रुपने सामाजिक उपक्रमांसोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले. गणेशमूर्ती विसर्जनानंतर मूर्ती तयार करण्यासाठी वापरलेले लोखंडी रॉड, पाईप व इतर साहित्य नदीपात्रात न सोडता ते बाहेर काढण्याची जबाबदारी मंडळाने पार पाडली. रक्तदान शिबिर, खर्डेकर चौक, शाहू महाराज पुतळा परिसर आणि दूधगंगा नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. मंडळाचे अध्यक्ष आशिष अजित पाटील आहेत.

भुये येथील यशवंत गणेश मंडळाने रक्तदान शिबिरांचे आयोजन, सफाई कामगारांचा सन्मान, सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रम आणि युवकांचा सक्रिय सहभाग अशा उपक्रमांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली. कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक व आध्यात्मिक प्रबोधन करण्यावरही मंडळाने भर दिला. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण विलास पन्हाळकर आहेत.

दरम्यान, बोरवडे येथील शिवशंभो तरुण मंडळाने भव्य पीक स्पर्धा, कीर्तनातून सामाजिक व आध्यात्मिक प्रबोधन, धनगरी ओव्यांचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम, जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले. तसेच वीटभट्टी कामगार आणि अनाथ मुलांना अन्नधान्य व खाऊचे वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग साताप्पा साठे आहेत.

शिरोली पोलीस ठाणे अंतर्गत गणराया अवार्ड 2026 मध्ये यशवंत गणेश मंडळ, भुये ता. करवीर क्रांती युवक मंडळ शिये ता. करवीर गणेश तरुण मंडळ टोप ता. हातकणंगले.यांना मिळाले.गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या या मंडळांनी उत्सवाचे खरे सामाजिक स्वरूप अधोरेखित केले आहे. केवळ देखावे, रोषणाई आणि मिरवणुका यांनाच महत्त्व न देता सामाजिक परिवर्तन, पर्यावरण रक्षण आणि लोकसहभागाला प्राधान्य देणाऱ्या मंडळांचा झालेला हा गौरव इतर गणेश मंडळांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.या वेळी करवीर उपविभागीय अधिकारी आप्पासो पवार, पो नि. रविद्र कळमकर,पी एस आय प्रमोद चव्हाण, पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड,पी एस आय अमित पांडे गोकुळ शिरगांव, सपोनि रणजित पाटील, सपोनि अभिजीत पाटील, यांच्या सह पोलीस अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!