संकटांवर जिद्दीने मात; गारमेंट व्यवसायातून वंदना शिरसाटे यांची यशोगाथा! पतीच्या निधनानंतर खचून न जाता उभारला स्वतःचा लघुउद्योग; दोन मुलांचे संगोपन करत सामाजिक कार्याचा वसा जपला
हेरवाड / प्रतिनिधी
कोरोची (ता.हातकणंगले) आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळला, परिस्थितीने साथ सोडली आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकटीवर येऊन पडली, तरी मनातील जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते. याचा प्रत्यय कोरोची येथील सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका वंदना शिरसाटे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातून दिला आहे. पतीच्या अकाली निधनानंतर आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जात त्यांनी गारमेंट व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन मुलांचे संगोपन, शिक्षणाची जबाबदारी आणि व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळत त्यांनी महिलांसमोर स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
पतीच्या निधनानंतर वंदना शिरसाटे यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले. दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि भविष्याची चिंता अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले. अशा कठीण प्रसंगी खचून न जाता त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्धार केला. परिस्थितीसमोर हात टेकण्याऐवजी कष्टाच्या जोरावर नवे आयुष्य घडविण्याचा निर्णय घेतला.
कापड आणि वस्त्रोद्योग क्षेत्राची असलेली आवड लक्षात घेऊन त्यांनी मर्यादित भांडवलात गारमेंटचा लघुउद्योग सुरू केला. सुरुवातीला अनेक अडचणी, आर्थिक मर्यादा आणि व्यवसायातील स्पर्धेचा सामना करावा लागला. मात्र, मेहनत, चिकाटी आणि कामातील सातत्य यांची सांगड घालत त्यांनी व्यवसायाचा पाया मजबूत केला. कपड्यांची आकर्षक शिलाई, उत्तम दर्जा आणि ग्राहकांशी प्रामाणिक व्यवहार यामुळे त्यांच्या कामाला अल्पावधीतच चांगली पसंती मिळू लागली.
विशेष म्हणजे, व्यवसायात स्वतःला सिद्ध करताना त्यांनी मातृत्वाची जबाबदारीही तितक्याच समर्थपणे पार पाडली. मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. स्वतःच्या कष्टातून संसाराला आर्थिक स्थैर्य मिळवून देतानाच त्यांनी सामाजिक कार्याची नाळही कायम जोडून ठेवली आहे.
आज त्यांच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या व्यवसायामुळे परिसरातील महिलांनाही रोजगार, कौशल्य आणि स्वावलंबनाची दिशा मिळत आहे. स्वतःच्या अनुभवातून त्या इतर गरजू महिलांना प्रोत्साहन देत असून, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आत्मविश्वास आणि कष्टांच्या बळावर यश मिळविता येते, हा संदेश देत आहेत.
पतीच्या निधनानंतर आलेल्या संकटांना संधीमध्ये बदलत स्वतःच्या कर्तृत्वाने यशाचा मार्ग निर्माण करणाऱ्या वंदना शिरसाटे यांचा प्रवास केवळ एका महिलेच्या संघर्षाची कहाणी नाही, तर प्रत्येक संकटग्रस्त महिलेला नव्याने उभे राहण्याची प्रेरणा देणारी यशोगाथा आहे. त्यांच्या या जिद्दीचे कोरोचीसह इचलकरंजी आणि परिसरातून कौतुक होत आहे.